मंगळावर यशस्वी हेलिकॉप्टर उडवण्यामागे भारतीय ब्रेन; डॉ. बालाराम यांची थक्क करणारी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 14:15 IST2021-04-20T14:14:11+5:302021-04-20T14:15:36+5:30
indian origin scientist bob balaram chief engineer ingenuity helicopter nasa: नासाकडून लिफाफा आला म्हणून लहानपणी नाचला अन् आज नासासाठीच इतिहास रचला

मंगळावर यशस्वी हेलिकॉप्टर उडवण्यामागे भारतीय ब्रेन; डॉ. बालाराम यांची थक्क करणारी कहाणी
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानं १९ एप्रिलला मंगळ ग्रहावर पहिल्यांदा इंजिन्युटी हेलिकॉप्टर उतरवून इतिहास रचला. पृथ्वीवरून नियंत्रित होणारं हेलिकॉप्टर किंवा रोटरक्राफ्ट मंगळावर उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण मोहिमेत एका भारतीय शास्त्रज्ञानं महत्त्वाची भूमिका बजावली. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबमध्ये काम करणाऱ्या डॉ. जे. बॉब बालाराम (Dr. J. Bob Balaram) यांनी महत्त्वाकांक्षी मोहिमत मोलाचं योगदान दिलं. बालाराम या मोहिमेचे प्रमुख इंजीनियर होते.
बॉब बालाराम यांचा जन्म दक्षिण भारतातला आहे. लहानपणापासूनच त्यांना अंतराळ विज्ञान आणि रॉकेट यामध्ये रस होता. बालाराम लहान असताना त्यांच्या काकांनी अमेरिकन दूतावासाला पत्र लिहून नासा आणि अंतराळाबद्दलची माहिती मागवली होती. एका लिफाफ्याच्या माध्यमातून दूतावासानं ही माहिती बालाराम यांच्या काकांना पाठवली. ती माहिती वाचून बालाराम यांना अतिशय आनंद झाला होता.
नासामध्ये इंटर्नशिप करताहेत भारताच्या या दोघी बहिणी; फोटो पाहताच कंगना फिदा होऊन म्हणाली...
चंद्रावर नील आर्मस्ट्राँग यांनी पहिलं पाऊल ठेवलं. ही बातमी बालाराम यांनी रेडिओवर ऐकली. तो दिवस आजही बालाराम यांच्या स्मरणात आहे. 'त्यावेळी इंटरनेट नव्हतं. पण तरीही अमेरिकेचं नाव प्रत्येकाला माहीत होतं. माणसानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्याची माहिती संपूर्ण जगाला रेडिओच्या माध्यमातून दिली गेली होती,' असं बालाराम यांनी सांगितलं.
मंगळ ग्रहावर इंजिन्युटी हेलिकॉप्टरनं केवळ ३० सेकंदांसाठीच का उड्डाण केलं, असा प्रश्न बालाराम यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला बालाराम यांनी उत्तर दिलं. '३० सेकंद उड्डाण केल्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा मंगळाच्या पृष्ठभूमीवर स्थिरावलं. मंगळाच्या वायूमंडळात कोणत्याही वस्तूचं लँडिंग करणं आणि तिचं उड्डाण करणं कठीण आहे. कारण तिथलं वायूमंडळ अतिशय हलकं आहे. त्यामुळे ३० सेकंदांसाठीच्या उड्डाणासाठी मला माझा ३५ वर्षांचा अनुभव पणाला लावावा लागला. अनेक देशांच्या शास्त्रज्ञांचं यामध्ये मोठं योगदान आहे,' असं बालाराम यांनी सांगितलं.