नोकराचे 4 वर्ष शोषण करणाऱ्या भारतीय दाम्पत्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 14:01 IST2018-11-04T13:45:28+5:302018-11-04T14:01:25+5:30
नोकराचे शोषण केल्याप्रकरणी दक्षिण इंग्लंडमध्ये एका भारतीय दाम्पत्याला अटक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

नोकराचे 4 वर्ष शोषण करणाऱ्या भारतीय दाम्पत्याला अटक
नोकराचे शोषण केल्याप्रकरणी दक्षिण इंग्लंडमध्ये एका भारतीय दाम्पत्याला अटक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. चार वर्ष नोकराचा शारीरिक व मानसिक छळ करून आपल्या घरात गुलाम म्हणून ठेवल्याचा आरोप या दाम्पत्यावर करण्यात आला आहे. पलविंदर आणि प्रीतपाल असे या दाम्पत्याचे नाव असून गँगमास्टर्स अँड लेबर एब्यूज अथोरिटी (जीएलएए) ने या दोघांना अटक केली आहे.
जीएलएएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिलवर्थ भागात हे भारतीय दाम्पत्य राहतं. काही महिन्याआधी पोलंडमधील एक व्यक्ती त्यांच्याकडे काम मागण्यासाठी आली होती. त्यावेळी या दाम्पत्याने राहण्याच्या व खाण्यापिण्याच्या अटींवर त्याला कामावर ठेवले मात्र प्रत्यक्षात नोकराचे 4 वर्ष शोषण केले. गुलामासारखी वागणूक देत त्याला त्रास दिला. तसेच खाण्यासाठी शिळे व सडलेले अन्न तर राहायला खोली न देता बागेत एक छोटीशी जागा दिल्याची माहिती नोकराने अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी भारतीय दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली. घरातील काही सामान जप्त करण्यात आलं असून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.