भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 06:59 IST2025-05-24T06:58:56+5:302025-05-24T06:59:15+5:30
द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी रशियात आले आहे.

भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
मॉस्को:रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी रात्री झालेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे काही काळासाठी विमानतळ बंद करण्यात आले. त्यामुळे भारतीय संसदीय शिष्टमंडळासह इतर प्रवाशांना घेऊन येणारे विमान मॉस्को विमानतळावर ४० मिनिटे उशिरा उतरले. हे विमान तोवर मॉस्कोच्या आकाशात घिरट्या घालत होते. द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी रशियात आले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर या दोन देशांमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाला व तणावही वाढला. मात्र, त्यानंतर १० मे रोजी शस्त्रसंधी करण्यात आली. या सर्व घटनांमागील भारताची भूमिका संसदीय शिष्टमंडळ रशियाच्या नेतृत्वासमोर मांडणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानविरोधात भारतासोबत रशिया, जपान आणि यूएईदेखील
सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ रशिया, जपान आणि संयुक्त अरब अमिरात येथे पोहोचले असून त्यांनी संबंधित देशांच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घेतली. दहशतवाद अजिबात खपवून घेणार नसल्याच्या भारताच्या धोरणाबाबत या शिष्टमंडळांनी या देशांत सांगितले. द्रमुकच्या खा. कनिमोळींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रशियन फेडरेशनचे उपपरराष्ट्रमंत्री अँड्री रुडेंको यांची भेट घेतली. यावेळी रशियाने दहशतवादविरोधात भारतासोबत असल्याची ग्वाही दिली.