अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 11:54 IST2025-09-18T11:53:19+5:302025-09-18T11:54:12+5:30
गेल्या तीन दशकांपासून अमेरिकेत व्यवसाय करत असलेल्या एका भारतीय वंशाच्या व्यावसायिकाला अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने अचानक ताब्यात घेतले आहे. दीड ...

अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
गेल्या तीन दशकांपासून अमेरिकेत व्यवसाय करत असलेल्या एका भारतीय वंशाच्या व्यावसायिकाला अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने अचानक ताब्यात घेतले आहे. दीड महिन्याहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या परमजीत सिंग यांच्या अटकेमुळे त्यांचे कुटुंब हताश झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ते कायदेशीर ग्रीन कार्ड धारक आहेत आणि अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत शांततापूर्वक राहत आहेत.
विमानतळावर अटक आणि धक्कादायक कारण!
३० जुलै रोजी परमजीत सिंग भारतातून परत येत असताना शिकागोच्या ओ'हेअर विमानतळावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपूर्वी केलेल्या एका किरकोळ गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी एका पे-फोनचा वापर केला होता, मात्र त्याचे बिल दिले नव्हते. या लहानशा गुन्ह्यासाठी त्यांनी आधीच शिक्षा भोगली आहे. एवढ्या जुन्या आणि लहान गुन्ह्यासाठी त्यांना ताब्यात घेणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे.
अटकेत तब्येत बिघडली
परमजीत यांना ब्रेन ट्यूमर आणि हृदयविकार आहे. अशा परिस्थितीतही त्यांना एक महिन्याहून अधिक काळ ताब्यात ठेवण्यात आले आहे. अटकेनंतर त्यांना पाच दिवस विमानतळावरच ठेवण्यात आले, जिथे त्यांची तब्येत खूपच बिघडली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयाचे बिल आल्यानंतरच त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची गंभीर अवस्था कळली. सध्या त्यांना केंटकीमधील एका डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
कुटुंब आणि वकिलांची सरकारकडे विनंती
परमजीत यांच्या कुटुंबाने त्यांच्या सुटकेसाठी जामीन अर्ज दाखल केला होता आणि त्यांना जामीन मंजूरही झाला आहे. मात्र, अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने जामीन प्रक्रियेला सातत्याने उशीर लावला आहे, ज्यामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत. "आम्ही फक्त जामीन रक्कम जमा करू इच्छितो, पण कोणाशी संपर्क साधावा हेच कळत नाहीये. आम्ही पूर्णपणे हताश झालो आहोत," असे परमजीत यांचे भाऊ चरणजीत सिंग यांनी सांगितले.
या प्रकरणी अमेरिकन सरकारचे म्हणणे आहे की, ग्रीन कार्ड हा एक अधिकार नसून, एक विशेषाधिकार आहे. जुना गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या नागरिकांना तपासणीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते. मात्र, परमजीत यांच्या कुटुंबीयांनी आणि वकिलांनी असे म्हटले आहे की त्यांनी नेहमीच नियमांचे पालन केले आहे आणि अमेरिकेत राहून योगदान दिले आहे. त्यांच्या मुलांचा जन्म अमेरिकेत झाला आहे आणि ते अमेरिकन समाजात सक्रियपणे सहभागी आहेत.