Accident News: अमेरिकेत दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातातभारतीय वंशाच्या ६ जणांना जीव गमवावा लागला. पहिली घटना डलासमध्ये घडली, जिथे एका हैदराबादी कुटुंबातील ४ जणांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला, तर दुसरी घटना न्यू यॉर्कमध्ये घडली, ज्यामध्ये क्लीव्हलँड स्टेट युनिव्हर्सिटीच्या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील वेंकट आणि तेजस्विनी आपल्या दोन मुलांसह अमेरिकेत फिरायला गेले होते. यादरम्यान, एका ट्रकने या कुटुंबाच्या कारला जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, कारने लगेचच पेट घेतला. यामुळे चौघांचाही होरपळून जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, मृतदेह लवकरच भारतात आणले जातील.
न्यू यॉर्कमध्ये दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यून्यू यॉर्कमधील ईस्ट कोकालिको टाउनशिपमध्ये आणखी एका भीषण रस्ते अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. भारतीय वाणिज्य दूतावासाने मंगळवारी ही माहिती दिली. २० वर्षीय मानव पटेल आणि २३ वर्षीय सौरव प्रभाकर, अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोन्ही विद्यार्थी क्लीव्हलँड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. माहितीनुसार, सौरव प्रभाकर कार चालवत होता. अपघाताच्या वेळी कार रस्त्यावरून घसरली, झाडावर आदळली आणि नंतर पुलावर आदळली. यात दोन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.