आम्ही काय अर्थव्यवस्था बंद करुन टाकायची का? पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांवर भारताच्या उच्चायुक्तांनी सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:05 IST2025-07-28T15:57:13+5:302025-07-28T16:05:28+5:30
रशियाकडून तेल खरेदी करण्यावरुन होत असलेल्या टीकेला ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

आम्ही काय अर्थव्यवस्था बंद करुन टाकायची का? पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांवर भारताच्या उच्चायुक्तांनी सुनावलं
Oil Trade: रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून पाश्चात्य देशांकडून होत असलेल्या टीकेला भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रशिया-युक्रेन युद्धात भारताने कधीही कोणत्याही देशाला उघडपणे पाठिंबा दिला नाही. रशियाशी असलेल्या ऐतिहासिक आणि धोरणात्मक संबंधांमुळे भारत त्यांच्या विरोधात गेला नाही. भारत हा जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे ज्याचे अजूनही रशियाशी व्यापारी संबंध आहेत. अमेरिकेसह पाश्चात्य देशांना यावर आक्षेप आहे. अशातच भारताकडूनही टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
भारताचे युनायटेड किंग्डममधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी रशियाकडून भारताच्या तेल आयातीबाबत स्पष्ट शब्दात आपले मत मांडले. भू-राजकीय कारणांमुळे भारत आपली अर्थव्यवस्था बंद करू शकत नाही, असं विक्रम दोराईस्वामी यांनी म्हटलं. भारत-रशिया संबंध आणि पाश्चात्य देशांकडून टीका होत असताना विक्रम दोराईस्वामी यांनी याबाबत भाष्य केलं. आम्ही आमची अर्थव्यवस्था बंद करायची का? असा सवाल विक्रम दोराईस्वामी यांनी केला.
"भारतावर प्रश्न उपस्थित करणारे अनेक युरोपीय देश स्वतः त्याच देशांकडून ऊर्जा आणि इतर संसाधने खरेदी करत आहेत ज्यांच्याकडून भारताला खरेदी करण्यापासून रोखले जात आहे. तुम्हाला हे थोडे विचित्र वाटत नाही का? भारताचे रशियाशी असलेले संबंध केवळ इंधनापुरते मर्यादित नाहीत. ते सुरक्षा, ऊर्जा आणि सहकार्य अशा अनेक पैलूंवर आधारित आहेत. एकेकाळी पाश्चात्य देश भारताला शस्त्रे विकत नव्हते आणि तिच शस्त्रे शेजाऱ्यांना देऊन आमच्याविरुद्ध वापरली जायची," असं विक्रम दोराईस्वामी यांनी म्हटलं.
"आज परिस्थिती अशी आहे की ज्या देशांकडून आपण तेल खरेदी करायचो ते आता ते इतरांना विकत आहेत आणि आपल्याला ऊर्जा बाजारातून वगळण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे कोणता पर्याय आहे? आम्ही आमची अर्थव्यवस्था बंद करायची का? अनेक देश त्यांच्या सोयीसाठी अशा देशांशी संबंध ठेवत आहेत जे भारतासाठी अडचणीचे कारण आहेत. आम्ही तुम्हाला एकनिष्ठ आहात का हे विचारतो का? आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघर्षाच्या परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ही युद्धाची वेळ नाही," असंही दोराईस्वामी यांनी म्हटलं.