भारत 6.42 कोटी एकर उजाड जमीन सुपिक बनवेल; मोदी यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 14:53 IST2019-09-09T14:53:04+5:302019-09-09T14:53:21+5:30
सरकारने शेतीमध्ये मायक्रो ईरिगेशन सारखे तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे काम केले.

भारत 6.42 कोटी एकर उजाड जमीन सुपिक बनवेल; मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कॉप-14 (कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज) सम्मेलनात सहभाग घेतला. हे सम्मेलन पर्यावरण संरक्षण, भूमि व्यवस्थापन आदी विषयांवर आधारित होते. यामध्ये 94 देशांच्या पर्यावरण मंत्र्यांसह जवळपास 190 देशांचे सहा हजार प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे.
मोदी यांनी या संमेलनामध्ये आश्वस्त करताना पर्यावरण संरक्षणात भारत सर्व प्रकारची मदत करेल आणि योगदानही देईल असे सांगितले. समुद्रातील पातळी वाढ, अनियमित पाऊस आणि वादळांमुळे जमिनीची हानी होत आहे. जलवायू परिवर्तनाचा नकारात्मक परिणाम जमिनीवर होत आहे. माझ्या सरकारने शेतीमध्ये मायक्रो ईरिगेशन सारखे तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे काम केले आहे. बायो-फर्टिलाइजर्सच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहोत. तसेच रासायनिक कीटकनाशकांचे उत्पादन कमी करण्यात येत आहे.
2015 ते 2017 मध्ये भारतात 8 लाख हेक्टर वनक्षेत्र वाढले आहे. उजाड माळरानावर, प्लॅस्टिकच्या वापरावर आम्ही काम सुरू केले आहे. सिंगल यूज प्लास्टिक बंद करण्याचा संकल्प केला आहे. आता सर्व जगालाही हे प्लॅस्टिक बंद करावे लागेल, असे मोदी म्हणाले. येत्या 2030 पर्यंत भारतातील 6.42 कोटी एकर उजाड जमीन लागवडीखाली आणणार असल्याची मोठी घोषणा मोदी यांनी केली.
भारताकडे अध्यक्षपद
दर दोन वर्षांनी होत असलेल्या या सम्मेलनामध्ये यूएनसीसीडीच्या अध्यक्षपदी भारताला संधी देण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 2 सप्टेंबरला कार्यक्रमाचे उद्घाटन केले होते. हे संमेलन 13 सप्टेंबरपर्यंत चालेल.