पाकिस्तानला आता विचार करावाच लागेल...; भारत-अमेरिका व्यापार करारानंतर तज्ज्ञांचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:55 IST2026-02-09T15:54:34+5:302026-02-09T15:55:52+5:30
US India Trade Deal, Pakistan: भारत-अमेरिका कराराचा पाकिस्तावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

पाकिस्तानला आता विचार करावाच लागेल...; भारत-अमेरिका व्यापार करारानंतर तज्ज्ञांचा थेट इशारा
US India Trade Deal: गेल्या काही दिवसांत जागतिक स्तरावरील राजकारणात अनेक बदल घडले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारामुळे दक्षिण आशियातील आर्थिक समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात अंतरिम व्यापार करार झाल्यानंतर पाकिस्तानचे (Pakistan) धाबे दणाणले असल्याचे दिसू लागले आहे. जागतिक राजकीय परिस्थितीचे अभ्यासक आणि तज्ज्ञ यांनी पाकिस्तानच्या सरकारला व्यापार धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचा स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारानुसार अमेरिकेने भारतावर लादलेले आयात शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. तसेच रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर लावण्यात आलेली अतिरिक्त २५ टक्के शुल्कदेखील हटवण्यात आले आहे. याबदल्यात भारताने रशियाकडून तेल आयात थांबवण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे जागतिक व्यापार व्यवस्थेत भारताची भूमिका अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे.
भारताच्या भूमिकेचे कौतुक
जागतिक व्यापार संघटनेतील पाकिस्तानचे माजी राजदूत डॉ. मन्जूर अहमद यांनी या कराराला भारताच्या पारंपरिक व्यापार धोरणातील मोठा बदल असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे भारताने बाजार अधिक खुला करण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांचे निरीक्षण आहे. तसेच, रशियन तेल आयात थांबवण्याचा करार आणि चीन-अमेरिका व्यापार धोरण या मुद्द्यावरून भारताने घेतलेली भूमिका जागतिक स्तरावरील महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
पाकला दिला सावधनतेचा सल्ला
डॉ. अहमद यांनी पाकिस्तानला या घडामोडींबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानचा सर्वात मोठा निर्यात बाजार अमेरिकाच असल्याने तेथील शुल्क धोरण किंवा बाजारातील प्रवेश नियमांमध्ये बदल झाल्यास, पाकिस्तानच्या वस्त्रोद्योगावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय पाकिस्तानने अमेरिकेसोबत व्यापक द्विपक्षीय व्यापार करारासाठी गंभीर प्रयत्न केले नाहीत, ही मोठी चूक असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.