भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 05:43 IST2025-07-25T05:43:31+5:302025-07-25T05:43:49+5:30
भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे.

भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
लंडन :भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. या करारामुळे ९९ टक्के भारतीय निर्यातीवरील शुल्क समाप्त होईल तसेच ब्रिटिश व्हिस्की, कार आणि इतर अनेक वस्तूंवरील शुल्कात कपात होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्या उपस्थितीत भारताचे वाणिज्यमंत्री पीयुष गोयल आणि ब्रिटिश वाणिज्यमंत्री जोनाथन रेनॉल्ड यांनी समझोत्यावर स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे दोन्ही देशांतील आयात-निर्यांतदारांना मोठा दिलासा मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
या भारतीय उद्योगांना होईल लाभ : वस्त्रोद्योग, चामडे, पादत्राणे, रत्ने व आभूषणे
हा दिवस ऐतिहासिक आहे. कित्येक वर्षांच्या कठोर परिश्रमांनंतर हा करार झाला आहे. यामुळे भारतीय तरुण, शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमई क्षेत्रास लाभ होईल. तसेच भारतीयांना टिश उत्पादने स्वस्तात उपलब्ध होतील.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भारतासोबत झालेला व्यापार समझोता हा ब्रिटनसाठी एक मोठा विजय आहे. समझोत्याचा दोन्ही देशांना लाभ होईल. लोकांच्या वेतनात वाढ होईल. राहणीमानाचा दर्जा सुधारेल. कामकरी लोकांच्या हातात अधिक पैसा खेळेल.
-केअर स्टार्मर, ब्रिटिश पंतप्रधान
महाराष्ट्राला काय फायदा?
भारत-इंग्लंड मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, कारागीर आणि सेवा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, असे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
> महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आंबा, द्राक्ष, फणस, बाजरी आणि सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होणार
> हळद, काळीमिरी आणि विलायची यांना जागतिक बाजारपेठेत चांगली पोहोच व अधिक नफा मिळणार
> निर्यातीवर शून्य कर लावल्यामुळे कोल्हापुरी चामडी पादत्राणे उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रोत्साहन, कोल्हापूरसारख्या लघु-मध्यम उद्योग केंद्रांना जागतिक फायदा