पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:47 IST2025-05-03T12:39:14+5:302025-05-03T12:47:18+5:30
भारताने पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे.

पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
India-Pakistan: पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने पाऊले उचचली आहेत. आता भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने पाकिस्तानमधून कोणत्याही प्रकारच्या वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. सरकारने शनिवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. जर कोणाला या बंदीतून सूट हवी असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगण्यात आलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे. भारताने पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानातून भारतात कोणत्याही वस्तूंची आयात होणार नाही. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. २ मे रोजी वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदी अंतर्गत, पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणत्याही उत्पादनाच्या आयातीवर पूर्ण बंदी असेल. ती थेट आयात असो किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही तिसऱ्या देशातून असो पाकिस्तानल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.
भारत सरकारने लादलेले हे निर्बंध २०२३ च्या परराष्ट्र व्यापार धोरणात नवीन तरतुदी असल्याचे सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, जर कोणत्याही परिस्थितीत आयातीला परवानगी दिली गेली तर त्यासाठी भारत सरकारची विशेष मान्यता आवश्यक असेल. दुसरीकडे, भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पाकिस्तानला दिलेल्या कर्जांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. याशिवाय, पाकिस्तानला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट होणे आणि आयएमएफने कर्ज मंजूर न करणे हे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का असेल.
भारताने पाकिस्तानी जहाजांना बंदरांवरून बंदी
दरम्यान, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसेच भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना पाकिस्तानातील बंदरांमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आलीय. भारतीय मालमत्ता, मालवाहतूक आणि बंदर पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी, व्यापारी शिपिंग कायदा, १९५८ च्या कलम ४११ अंतर्गत तात्काळ निर्बंध लादण्यात आले आहेत.