पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:12 IST2025-10-25T13:11:29+5:302025-10-25T13:12:49+5:30
India Slams Pakistan in UN : पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप केला.

पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
India Slams Pakistan in UN : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानला पुन्हा एकदा जम्मू-काश्मीर विषयावर भारताकडून तोंडघशी पडावं लागलं. पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप करताच भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकला कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिलं.
पी. हरीश म्हणाले की, “आम्ही पाकिस्तानला आवाहन करतो की, त्यांनी पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या भागांमध्ये (PoJK) चालू असलेलं मानवी हक्कांचं उल्लंघन तात्काळ थांबवावं. तेथील जनता पाकिस्तानी सैन्याचा ताबा, दडपशाही, क्रूरता आणि नैसर्गिक संसाधनांच्या बेकायदेशीर शोषणाविरोधात उघडपणे बंड पुकारत आहे.”
जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग
“जम्मू-काश्मीर हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील. जम्मू-काश्मीरमधील लोक भारताच्या लोकशाही परंपरांनुसार आणि संविधानिक चौकटीत राहून आपल्या मूलभूत अधिकारांचा वापर करतात. या संकल्पना पाकिस्तानसाठी परक्या आहेत,” असा टोलाही हरीश यांनी लगावला.
#WATCH | PR of India to the UN, Parvathaneni Harish's complete address at the UNSC Open Debate on ‘The United Nations Organization: Looking into the Future’
— ANI (@ANI) October 25, 2025
(Source: India at UN, NY/X) pic.twitter.com/67rUwFwtfz
‘वसुधैव कुटुंबकम्’चा उल्लेख
भारताच्या “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वज्ञानाचा उल्लेख करत हरीश म्हणाले की “भारत जगाला एक कुटुंब मानतो आणि सर्वांसाठी न्याय, सन्मान आणि समृद्धीची अपक्षा करतो. ही केवळ आमची विश्वदृष्टी नाही, तर याच कारणामुळे भारत सर्व समाज आणि लोकांसाठी न्याय, सन्मान आणि संधीच्या समर्थनात कायम उभा आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
संयुक्त राष्ट्राच्या प्रासंगिकतेवर प्रश्न
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत बोलताना भारतीय राजदूतांनी द्वितीय महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रानं केलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितलं की, “आजच्या काळात या संस्थेच्या प्रासंगिकता, वैधता, विश्वसनीयता आणि कार्यक्षमता यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या चर्चेचा विषय आज अधिक महत्त्वाचा ठरतो, कारण जगातील सर्वात मोठ्या बहुपक्षीय संस्थेला, म्हणजे संयुक्त राष्ट्राला स्वतःच्या प्रासंगिकतेबाबत प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. संस्थेनं वसाहतवादाच्या समाप्तीसाठी काम केले असून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी ती आशेचा किरण ठरली आहे,” असंही ते यावेळी म्हणाले.