अमेरिकेच्या निर्बंधांचा भारताला फायदा; रशियाने तेलाच्या किमती कमी केल्या ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 20:00 IST2025-11-07T19:59:34+5:302025-11-07T20:00:03+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या प्रमुख तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

अमेरिकेच्या निर्बंधांचा भारताला फायदा; रशियाने तेलाच्या किमती कमी केल्या ...
India-Russia Relation: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या प्रमुख तेल कंपन्यांवर लावलेल्या निर्बंधांचा तात्काळ परिणाम दिसू लागला आहे. रशियाच्या दोन मोठ्या ग्राहक देशांनी (भारत आणि चीन) रशियन तेल खरेदी कमी केली आहे. यामुळे रशियाला आपल्या तेलाच्या किमती कमी करुन मोठी सवलत द्यावी लागली आहे.
रशियाने भारत-चीनला दिली जास्त सवलत
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने आपल्या ‘युरल्स क्रूड’ या प्रमुख तेलाच्या दरात ब्रेंटच्या तुलनेत प्रति बॅरल 4 डॉलर्सची अतिरिक्त सूट दिली आहे. डिसेंबर डिलिव्हरीसाठी ही किंमत सुमारे एका वर्षातील सर्वात कमी स्तरावर पोहोचली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत रशियाने ही सूट 2 डॉलर्सने वाढवली आहे. मात्र, ही सूट 2022 मध्ये पश्चिमी देशांनी रशियावर निर्बंध लावल्यानंतर मिळालेल्या 8 डॉलर्स प्रति बॅरल सवलतीपेक्षा अजूनही कमी आहे.
अमेरिकेचे कठोर निर्बंध
अमेरिकेने अलीकडेच रशियाच्या दोन प्रमुख कंपन्यांवर रोसनेफ्ट (Rosneft) आणि लुकोइल (Lukoil) कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. म्प प्रशासनाने या कंपन्यांशी असलेले सर्व व्यवहार 21 नोव्हेंबरपूर्वी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानंतर भारतातील प्रमुख रिफायनरीज HPCL, BPCL, MRPL, HMEL आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी डिसेंबरसाठी रशियन तेलाची ऑर्डर रद्द केली. विशेष म्हणजे, या पाचही कंपन्यांचा एकत्रित वाटा भारतातील रशियन तेल आयातीच्या जवळपास 65 टक्के आहे.
आशियाई बाजारात दोन गट
चीनच्या सरकारी तेल कंपन्यांनी देखील समुद्रमार्गे येणाऱ्या रशियन तेलाच्या खरेदीला स्थगिती दिली आहे. परिणामी, चिनी बंदरांवरील ESPO ब्लेंड तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आता आशियाई बाजार दोन गटांत विभागला आहे. अप्रतिबंधित देशांकडून येणारे तेल प्रीमियम दरात विकले जात आहे, तर निर्बंधित रशियन कंपन्यांशी संबंधित तेल मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे.
भारतातील मागणी घसरली
भारतामध्ये रशियन तेलाची मागणी गेल्या काही आठवड्यांत लक्षणीयरीत्या घटली आहे डिसेंबरमध्ये आयात आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घसरण अशा वेळी होत आहे, जेव्हा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्याची तयारी करत आहेत, आणि अमेरिका भारत-चीन दोघांवरही रशियन तेल आयात कमी करण्यासाठी दबाव आणत आहे.