India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 12:13 IST2025-05-10T12:06:56+5:302025-05-10T12:13:03+5:30

Indian Pakistan Latest Update: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. दहशतवाद्यांचे अड्डे उडवल्यामुळे वेडापिसा झालेल्या पाकिस्तानने भारतातील लष्करी तळ आणि गावांवर निष्फळ हल्ले केले. ९ आणि १० मेच्या रात्री हा लष्करी संघर्ष आणखी विकोपाला गेला. 

India Pakistan Tension: What time did Pakistan launch a high-speed missile attack? Army said what happened on the night of May 9-10? | India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?

India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?

India Pakistan Update in Marathi: ८ आणि ९ मेच्या रात्री पाकिस्तानने ड्रोन्स आणि मिसाईल्स डागल्या. त्यांचा भारताने हवेतच उद्ध्वस्त केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला. त्यानंतर ९ आणि १० मेच्या रात्री पाकिस्तानकडून हायस्पीड मिसाईल हल्ले करण्यात आले. या मिसाईल्स फुसका बार ठरल्या. भारतीय लष्कराने हवेतच या मिसाईलच्या चिंधड्या केल्या. याबद्दल माहिती भारतीय लष्कर आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'पाकिस्तानने सीमेवर फक्त गोळीबारच केला नाही. तर कुपवाडा, पुंछ, राजौरीमध्ये कमी तीव्रतेचे हल्ले करण्यात आले. हे हल्ले भारतीय लष्कराने परतवून लावले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांना भारतीय लष्कराने जशास तसे उत्तर दिले आहे', अशी माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली. 

वाचा >>पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 

पाकिस्तानकडून हायस्पीड मिसाईल हल्लेही करण्यात आले, पण भारताने मिसाईल हवेतच निष्क्रिय केला, असेही त्यांनी सांगितले.  

भारतावर हल्ला करण्यासाठी कशाचा वापर?

पाकिस्तान लष्कराने पश्चिम सीमेवर आक्रमक हल्ले केले. यात ड्रोन्स, दूरवर मारा करणारे अस्त्र, लढाऊ विमाने यांचाही वापर करण्यात आला. पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य केले. नियंत्रण रेषेवरही ड्रोन्स घुसखोरी आणि उखळी तोफांनी हल्ले केले, असे कर्नल कुरैशी यांनी सांगितले.

 

आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवरून २६ पेक्षा अधिक ठिकाणी घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले गेले. भारतीय लष्कराने यशस्वीपणे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले. उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, पुंछ, भठिंडा या हवाई दलाच्या तळावर हल्ले केले, अशी माहिती कर्नल कुरैशी यांनी दिली. 

पाकिस्तानने डागली हायस्पीड मिसाईल

कर्नल कुरैशी यांनी सांगितले की, "पाकिस्तानने एक हायस्पीड मिसाईल सकाळी (१० मे) १.४० वाजता डागली. ही मिसाईल पंजाबमधील हवाई दलाच्या तळावर सोडण्यात आली होती. ही मिसाईल निष्क्रिय करण्यात आली. पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपूर, उधमपूर येथील, हवाई दलाच्या तळांवर, रुग्णालय आणि शाळेवर हल्ला केला. पाकिस्तानकडून हे जाणीवपूर्वक करण्यात आले." 

भारताने पाकिस्तान कुठे केले हल्ले?

"भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या हल्ल्यांना तत्काळ आणि नियोजन पद्धतीने प्रत्युत्तर दिले. तांत्रिक तळ, कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर, रडार साईट्स आणि शस्त्र भंडारावर हल्ले केले. रफिकी, मुरीद, चक्रला, रहेमिया खान, जुन्निया या पाकिस्तान लष्कराच्या ठिकाणांवर हवाई अस्त्र आणि लढाऊ विमानांतून प्रहार करण्यात आला", अशी माहिती कुरैशी यांनी दिली.   

"पसूरमधील रडार ठिकाण, सियालकोटच्या हवाई दलाच्या तळावरही हल्ला करण्यात आला. या कारवाई दरम्यान, भारताने नागरिक ठिकाणांचं नुकसान कमीत कमी होईल याची काळजी घेतली", असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: India Pakistan Tension: What time did Pakistan launch a high-speed missile attack? Army said what happened on the night of May 9-10?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.