"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 08:08 IST2025-05-04T08:07:07+5:302025-05-04T08:08:03+5:30
भारत आणि पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. त्यासाठी हा तणाव कमी करणे गरजेचे आहे. काश्मीर हल्ल्याची तटस्थ आणि विश्वसनीय जागतिक चौकशी व्हायला हवी अशी मागणी पाकिस्तानी राजदूत जमालीने घेतली आहे.

"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
कराची - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यातच पाकिस्ताननं पुन्हा एकदा अणुहल्ल्याची पोकळ धमकी भारताला दिली आहे. रशियात पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमालीने ही धमकी दिली आहे. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला अथवा सिंधु नदीचं पाणी रोखलं तर पाकिस्तान केवळ पारंपारिक शस्त्रांनीच नव्हे तर अण्वस्त्रांनीही प्रत्युत्तर देईल असं खालिद जमालीने म्हटलं आहे.
रशियन टीव्ही चॅनेलला त्याची मुलाखत झाली. त्यात पाकिस्तानी राजदूत म्हणाले की, आमच्याकडे भारताकडून सैन्य कारवाई करण्याच्या प्लॅनिंगचे ठोस पुरावे आहेत. काही लीक झालेल्या कागदपत्रानुसार पाकिस्तानच्या काही भागांवर हल्ला करण्याची योजना बनवली आहे. हा हल्ला लवकरच होऊ शकतो, कधीही होऊ शकतो असा दावा त्यांनी केला. पाकिस्तान कुठल्याही हल्ल्याला पूर्ण ताकदीनं उत्तर देईल. ज्यात पारंपारिक आणि अणुवस्त्राचाही समावेश असेल असं त्यांनी सांगितले.
तसेच सिंधु जल करार स्थगितीवर त्याने भाष्य केले. भारताने जर खालील भागात पाणी रोखले तर ते पाकिस्तानविरोधात एक्ट ऑफ वॉर मानले जाईल त्याचे उत्तर आम्ही सैन्य कारवाईने देऊ. भारत आणि पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. त्यासाठी हा तणाव कमी करणे गरजेचे आहे. काश्मीर हल्ल्याची तटस्थ आणि विश्वसनीय जागतिक चौकशी व्हायला हवी. त्यात चीन, रशियाने पुढाकार घ्यावा अशी मागणीही पाकिस्तानी राजदूत जमालीने केली.
पाकविरोधात भारताची कठोर पावले
२२ एप्रिलला पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, त्यात निष्पाप २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. भारताने या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकविरोधात कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारतीय सैन्याला खुली सूट दिली आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना थेट इशाराही दिला आहे.