india pakistan and china raised nuclear weapons says sipri report | भारत, पाकिस्तान आणि चीनकडून अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ
भारत, पाकिस्तान आणि चीनकडून अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली : भारत, चीन आणि पाकिस्तान या शेजारी देशांनी गेल्या वर्षभरात अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ केली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सिपरी) ताज्या अहवालातून याबद्दलची आकडेवारी समोर आली आहे. आशियातील तीन प्रमुख देश असलेल्या भारत, चीन आणि पाकिस्ताननं गेल्या वर्षभरात अण्वस्त्र यंत्रणा अधिक सुसज्ज केली असून अण्वस्त्रांच्या संख्येतही वाढ केली आहे. सध्या हे तिन्ही देश अत्याधुनिक आणि लहान अण्वस्त्रांच्या विकासावर भर देत असल्याचं सिपरीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अण्वस्त्रांच्या संख्येचा विचार केल्यास पाकिस्तान आत्ताही भारताच्या पुढे आहे. 

आशिया खंडात अण्वस्त्र स्पर्धा सुरू असताना पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र स्थिरता आहे, असं निरीक्षण सिपरीनं नोंदवलं आहे. सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात तिन्ही देशांकडे असणाऱ्या अण्वस्त्रांबद्दलची आकडेवारी देण्यात आली आहे. 'गेल्या वर्षी चीनकडे असणाऱ्या अण्वस्त्रांची संख्या 270 इतकी आहे. आता ती वाढून 280 वर पोहोचली आहे. भारताकडे सध्याच्या घडीला 130 ते 140 अण्वस्त्र असून पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या 140 ते 150 इतकी आहे. मात्र यातील कोणतंही अण्वस्त्र डागण्यासाठी क्षेपणास्त्रात लावण्यात आलेलं नाही,' असं सिपरीचा अहवाल सांगतो. 

चीननं गेल्या वर्षी संरक्षण दलांवर 228 अब्ज डॉलर खर्च केला आहे. संरक्षण सामर्थ्यावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत चीन अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि पाकिस्ताननं गेल्या वर्षभरात अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ केल्याचं सिपरीचा अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 'भारत आणि पाकिस्ताननं जमीन, हवा आणि समुद्रातून डागता येणारी अण्वस्त्र तयार करण्यास प्राधान्य दिलं आहे. गेल्या वर्षभरात या दोन्ही देशांनी त्यांच्या अण्वस्त्रांच्या ताफ्यात प्रत्येकी 10 अण्वस्त्रांनी वाढ केली आहे', अशी आकडेवारी अहवालात आहे. 
 

Web Title: india pakistan and china raised nuclear weapons says sipri report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.