मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:01 IST2025-12-18T18:00:13+5:302025-12-18T18:01:43+5:30
India Oman FTA: पश्चिम आशियातील भारताची आर्थिक आणि राजनैतिक पॉवर अधिक मजबूत करणारा हा करार आहे.

मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
India Oman FTA: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (18 डिसेंबर 2025) ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक अल सईद यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान भारत आणि ओमान यांच्यात मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) करण्यात आला. या ऐतिहासिक प्रसंगी, द्विपक्षीय संबंध दृढ करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल ओमान सरकारकडून पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ ओमान’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले.
भारत-ओमान करारातून भारताला काय फायदा?
या करारामुळे भारताच्या श्रमप्रधान क्षेत्रांना मोठी चालना मिळणार आहे. विशेषतः..
- वस्त्रोद्योग
- चर्मोद्योग
- रत्न व दागिने
- अभियांत्रिकी उत्पादने
- प्लास्टिक व फर्निचर
- कृषी उत्पादने
- औषधे व वैद्यकीय उपकरणे
- ऑटोमोबाइल क्षेत्र
वरील क्षेत्रातील निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. परिणामी रोजगारनिर्मिती वाढेल, कारागीर, महिला-नेतृत्वाखालील उद्योग तसेच MSME क्षेत्र अधिक बळकट होईल. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या सहा महिन्यांतील भारताचा हा दुसरा मुक्त व्यापार करार आहे. अलीकडच्या काळात भारताने केलेल्या FTAमुळे शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांना थेट लाभ होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
Today, we are taking a historic step forward in India-Oman relations, whose positive impact will be felt for decades to come. The Comprehensive Economic Partnership Agreement (CEPA) will energise our ties in the 21st century.
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2025
It will give new momentum to trade, investment and… https://t.co/kqbgEbVogrpic.twitter.com/dFFNQ764ac
GCC देशांशी व्यापार विस्ताराची दिशा
भारताचा खाडी सहयोग परिषद (GCC) सदस्य असलेल्या संयुक्त अरब अमिरातीसोबत आधीच असा करार आहे, जो मे 2022 पासून लागू आहे. GCC मध्ये बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया, कतार आणि ओमान यांचा समावेश आहे. भारत आणि कतार यांच्यातही लवकरच व्यापार करारासाठी चर्चा सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारत-ओमान द्विपक्षीय व्यापार सुमारे 10.5 अब्ज अमेरिकी डॉलर इतका होता. यात भारताची निर्यात 4 अब्ज डॉलर, तर आयात 6.54 अब्ज डॉलर होती.
ओमानकडून भारत काय आयात करतो?
- प्रोपिलीन व इथिलीन पॉलिमर
- पेट कोक
- जिप्सम
- रसायने
- लोह व पोलाद
- अपरिष्कृत अॅल्युमिनियम
भारत ओमानला काय निर्यात करतो?
- खनिज इंधन
- रसायने
- मौल्यवान धातू
- लोह व पोलाद
- धान्य
- जहाजे व नौका
- इलेक्ट्रिकल यंत्रसामग्री
- बॉयलर
- चहा, कॉफी व मसाले
- कापड व अन्नपदार्थ
भारतासाठी चार मोठ्या बाजारांचे दरवाजे उघडणार
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, भारत-ओमान FTA मुळे वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया, ऑटोमोबाइल, दागिने, कृषी-रसायने, नवीकरणीय ऊर्जा आणि ऑटो कंपोनंट्स क्षेत्रात नवे संधी निर्माण होतील. GCC, पूर्व युरोप, मध्य आशिया आणि आफ्रिकेचे प्रवेशद्वार असल्याचे सांगितले. त्यामुळे भारतीय उद्योगांना जागतिक बाजारपेठांमध्ये अधिक सुलभ प्रवेश मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.