भारत-नेपाळमध्ये सीमावाद उफाळला; रस्त्याच्या रुंदीकरणावर नेपाळ सरकारने घेतला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 10:07 IST2022-11-01T10:07:34+5:302022-11-01T10:07:43+5:30
नेपाळच्या अधिकाऱ्यांनी सीमेजवळील १.१० किमी रस्त्याच्या रुंदीकरणावर आक्षेप घेतला.

भारत-नेपाळमध्ये सीमावाद उफाळला; रस्त्याच्या रुंदीकरणावर नेपाळ सरकारने घेतला आक्षेप
सीतामढी : नेपाळ आणि भारतात नव्याने सीमावाद उफाळला असून, दोन्ही देशांच्या सीमेजवळ भारतात बांधण्यात येत असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणावर नेपाळ सरकारने आक्षेप घेतला आहे. त्यानंतर या रस्त्याचे काम बंद करण्यात आले आहे. हा रस्ता सीतामढीच्या अनेक भागांना सीमेवरील भीथामोड आणि नेपाळमधील जनकपूरला थेट जोडतो. या भागात पूल बांधण्यात येणार आहे.
नेपाळच्या अधिकाऱ्यांनी सीमेजवळील १.१० किमी रस्त्याच्या रुंदीकरणावर आक्षेप घेतला. हा रस्ता पाटनापासून १३५ किमी उत्तरेस सीतामढी जिल्ह्यातील सुरसंद ब्लॉकमध्ये बांधला जात आहे. हे प्रकरण सोडवण्यासाठी गृहविभागाला पत्र पाठवण्यात आले आहे.
काय आहे वाद?
नेपाळने उत्तराखंडमधील लिपुलेख येथे भारताचा रस्ता रुंदीकरणाच्या कामाबद्दल भारताला इशारा दिला आणि ते काम त्वरित थांबवण्यास सांगितले. नेपाळने उत्तराखंडमधील लिपुलेखला स्वत:चा भूभाग म्हटले होते. भारत, नेपाळ आणि चीनच्या सीमेवर ३३८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला हा परिसर गुजरातची राजधानी गांधीनगरपेक्षाही मोठा आहे.
अधिकाऱ्यांना धक्का
अधिकाऱ्याने सांगितले की, आक्षेपामुळे धक्का बसला. घटनास्थळी दोन्ही देशांदरम्यान स्पष्ट सीमांकित सीमा आहे. रस्ते बांधणीचे काम ठप्प झाल्यामुळे लोकांना प्रवास करणे कठीण जात आहे.