15 मार्चपर्यंत आपले सैन्य हटवा; मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भारताला डेडलाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 20:52 IST2024-01-14T20:51:47+5:302024-01-14T20:52:29+5:30
चीन दौऱ्यावरुन परतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे.

15 मार्चपर्यंत आपले सैन्य हटवा; मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भारताला डेडलाईन
India-Maldives: गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला भारत आणि मालदीवमधला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. यातच आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी पुन्हा एकदा भारताला आपले सैन्य मालदीवमधून हटवण्यासाठी इशारा दिला असून, भारताला 15 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे, मुइज्जू शनिवारीच चीन दौऱ्यावरुन परत आले आणि भारताला हा इशारा दिला आहे. चीन दौऱ्यात मुइझू यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली.
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लष्कराची एक तुकडी मालदीवमध्ये तैनात आहे. मालदीवच्या मागील सरकारच्या विनंतीवरुन ही तुकडी तेथे तैनात करण्यात आली होती. भारतीय लष्कराची ही तुकडी मालदीवच्या लष्कराला सागरी सुरक्षा तसेच आपत्ती निवारण कार्यात मदत करते, परंतु आता मुइझ्झूच्या सरकारने भारतीय लष्कराच्या तुकडीला 15 मार्चपर्यंत मालदीव सोडण्याचे आदेश दिले आहेत.
तुकडीमध्ये 88 सैनिकांचा समावेश
मालदीवचे सार्वजनिक धोरण सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनी म्हटले की, भारतीय सैन्य यापुढे देशात राहू शकत नाहीत. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि त्यांच्या सरकारचे हे धोरण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालदीवमध्ये भारतीय लष्कराचे 88 सैनिक उपस्थित आहेत. मुइज्जू सरकारने सुमारे दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले होते, परंतु आता त्यांनी यासाठी मुदतही निश्चित केली आहे.
मुइज्जू भारताचे विरोधक
दोन महिन्यांपूर्वी मुइझ्झू म्हणाले होते की, मालदीवला आपल्या भूमीवर परदेशी सैन्याची उपस्थिती चालणार नाही. मुइझू हे चीनच्या जवळचे मानले जातात आणि त्यांच्या 'इंडिया आऊट' मोहिमेतूनच त्यांना मालदीवमध्ये सत्ता मिळाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्षपपदाच्या निवडणुकीदरम्यान मुइज्जूने भारतीय सैनिकांना परत पाठवण्याचे आश्वासन जनतेला दिले होते.