भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:29 IST2025-10-16T09:29:29+5:302025-10-16T09:29:50+5:30
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून अनेक देशांवर दबाव असताना, भारताने मात्र आपल्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत मोठी खरेदी केली आहे.

भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून अनेक देशांवर दबाव असताना, भारताने मात्र आपल्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत मोठी खरेदी केली आहे. सप्टेंबर महिन्यात भारतानेरशियाकडून तब्बल २५ हजार ५९७ कोटी रुपये मूल्याचे कच्चे तेल खरेदी केले आहे. हेलसिंकीस्थित सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या ताज्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. या मोठ्या खरेदीमुळे चीननंतर भारत हा रशियन जीवाश्म इंधनाचा खरेदीदार देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पहिल्या क्रमांकावर कोण?
CREAच्या अहवालानुसार, सप्टेंबर महिन्यात चीनने रशियाकडून ३.२ अब्ज युरोचे कच्चे तेल खरेदी केले आणि तो रशियन जीवाश्म इंधनाचा सर्वात मोठा आयातक ठरला. चीनचे एकूण आयात ५.५ अब्ज युरो होते. तर, भारताने याच काळात एकूण ३.६ अब्ज युरो (अंदाजे ३२,७०० कोटी रुपये) मूल्याचे जीवाश्म इंधन (कोळसा आणि रिफाइन्ड इंधनसह) आयात केले. चीन आणि भारतापाठोपाठ तुर्कस्तान, युरोपीय संघ आणि दक्षिण कोरिया यांचा क्रमांक लागतो.
भारताची खरेदी ९ टक्क्यांनी घटली, तरी...
विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात भारताने रशियाकडून केलेल्या कच्चा तेलाच्या आयातीत मागील महिन्याच्या तुलनेत ९ टक्क्यांची घट झाली आहे. ही घट फेब्रुवारी नंतरची सर्वात नीचांकी पातळी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी केलेल्या खरेदीत ३८% ची मोठी घट झाली, जी मे २०२२ नंतरची सर्वात कमी आहे.
कच्च्या तेलाव्यतिरिक्त, भारताने रशियाकडून ४५.२ कोटी युरोचा कोळसा आणि ३४.४ कोटी युरोचे रिफाइन्ड तेल खरेदी केले. चीनने मात्र कच्चे तेल, एलएनजी आणि कोळसा या सर्वांमध्ये मोठी खरेदी केली.
अमेरिकेचा दबाव, पण भारताला स्वस्त क्रूडची गरज
रशियाकडून तेल खरेदी कमी करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने भारतावर दबाव वाढवला होता, एवढेच नव्हे तर, इतर देशांवर कोणतीही कारवाई न करता भारतीय निर्यातीवर २५% अतिरिक्त शुल्कही लावले होते, असे रिपोर्टमध्ये नमूद आहे. आयात पातळी घटली असली तरी, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि स्वस्त क्रूड मिळवण्यासाठी रशिया अजूनही भारतासाठी एक प्रमुख स्रोत आहे.
इतर देशांची स्थिती काय?
तुर्कीने रशियाकडून २.६ अब्ज युरोचे इंधन खरेदी करून तिसरे स्थान मिळवले. तर, युरोपीय संघाने ७४.३ कोटी युरोची एलएनजी आणि पाइपलाइन गॅस तसेच ३१.१ कोटी युरोचे कच्चे तेल खरेदी केले आहे. दक्षिण कोरिया २८.३ कोटी युरोच्या खरेदीसह पाचव्या स्थानावर राहिला.