भारतानेपाकिस्तानवर 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत कारवाई करून जवळपास दोन महिने झाली आहेत. मात्र अद्यापही पाकिस्तानचे घाव भरलेले दिसत नाहीत. आता पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री मोहसीन नक्वी यांनी पाक एअरबेसवरील हल्ल्यासंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. भारताने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत मे महिन्यात पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली होती. त्यावेळी तेथे एअरक्राफ्ट उभे होते आणि पाकिस्तानी हवाई दलाचे सैनिकही उपस्थित होते.
पाकिस्तानी वृत्तवाहिनी समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मोहसिन नक्वी यांनी गुरुवारी (३ जुलै २०२५) मोहरमच्या दिवशी इस्लामिक धर्मगुरूंसोबत झालेल्या बैठकीत हा खुलासा केला आणि भारताने पाकिस्तानी एअरबेसवर ११ क्षेपणास्त्रे डागली, मात्र एअरबेसचे काहीही नुकसान झाले नाही, असे म्हटले आहे. पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरसंदर्भात सतत्याने आपल्या शौर्याच्या खोट्या गप्पा मारत आला आहे. मोहसिन नक्वीही इस्लामिक विद्वानांसमोर हेच करत आहेत.
आसिम मुनीर यांच्यासंदर्भात काय म्हणाले मोहसिन नक्वी? -मोठ मोठ्या गप्पा मारत मोहसिन नक्वी म्हणाले, "पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्वात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या शौर्याने लढा दिला. जेव्हा भारतासोबत युद्ध झाले, तेव्हा अल्लाहतालाने आपल्याला मदत केली. तसेच त्यावेळी लष्कर प्रमुखही खंबीरपणे उभे होते. त्यांना कसलीही अडचण नव्हती. तसेच, त्यांनी हल्ला केला, तर त्यांना चारपट भोगावे लागेल, याची स्पष्टता होती." दरम्यान, भारतीय नागरिकांना नुकसान पोहोचवण्याची अथवा तणाव वाढवण्याची पाकिस्तानची इच्छा नाही, असेही ते म्हणाले.
इस्लामिक विद्वानांसोबत झालेल्या बैठकीवेळी मोहसीन नक्वी यांच्यासोबत अंतर्गत व्यवहार राज्यमंत्री तलाल चौधरी, रुअत-ए-हिलाल समितीचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कबीर आझाद आदी उपस्थित होते.