पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:27 IST2025-12-16T12:25:31+5:302025-12-16T12:27:28+5:30
India-Jordan: संपूर्ण मिडिल ईस्टमध्ये जॉर्डनने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
India-Jordan: मध्य पूर्वेतील बहुतांश देश अमेरिका, सौदी अरेबिया किंवा इराण यांच्यापैकी एखाद्या देशाशी जोडलेले दिसतात. मात्र, जॉर्डन हा देश याला अपवाद ठरतो. अरब देशांसोबतच इस्रायल आणि पाश्चात्त्य राष्ट्रांशी संतुलित संबंध ठेवणारा जॉर्डन संपूर्ण मिडिल ईस्टमधील एक अनोखी आणि शांत ताकद म्हणून ओळखला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या याच देशाच्या दौऱ्यावर गेल्याने भारत-जॉर्डन संबंधांना नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.
पंतप्रधान मोदींचा पश्चिम आशिया-आफ्रिका दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा उद्देश पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील रणनीतिक भागीदारी मजबूत करणे हा आहे. जागतिक स्तरावर व्यापार तणाव, ऊर्जा संकट, सुरक्षा आव्हाने आणि आर्थिक अनिश्चितता वाढलेली असताना भारताने हा पुढाकार घेतला आहे. सोमवारी पंतप्रधान मोदी जॉर्डनची राजधानी अम्मान येथे दाखल झाले, जिथे त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
Held productive discussions with His Majesty King Abdullah II in Amman. His personal commitment towards vibrant India-Jordan relations is noteworthy. This year, we are celebrating the 75th anniversary of our bilateral diplomatic relations. This milestone will continue to inspire… pic.twitter.com/371jjHdtTx
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2025
किंग अब्दुल्ला II यांच्याशी भेटीला जागतिक महत्त्व
अम्मानमध्ये पंतप्रधान मोदींनी जॉर्डनचे प्रमुख किंग अब्दुल्ला II आणि पंतप्रधान जाफर हसन यांची भेट घेतली. ही भेट जागतिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. याचे कारण म्हणजे, जॉर्डन हा मध्य पूर्वातील असा देश आहे, जो कोणत्याही एका महासत्तेवर अवलंबून न राहता स्वतंत्र आणि संतुलित परराष्ट्र धोरण राबवतो. भारताचा जॉर्डनशी वाढता संवाद हा याच दिशेने सूचित करतो की, भारत मध्य पूर्वेत केवळ सौदी अरेबिया किंवा इराणपुरता मर्यादित न राहता, इतर महत्त्वाच्या शक्तींशीही संबंध दृढ करू इच्छितो.
जॉर्डनचे वेगळे परराष्ट्र धोरण
जॉर्डनचे परराष्ट्र धोरण इतर मध्य पूर्वी देशांपेक्षा वेगळे आहे. अरब देशांशी घनिष्ठ संबंध, इस्रायलसोबत राजनैतिक संवाद, तर अमेरिका व पाश्चात्त्य देशांशी सहकार्य. या त्रिसूत्री धोरणामुळे जॉर्डनने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
जॉर्डनची ‘सायलेंट पॉवर’
जॉर्डनची रणनीतिक भौगोलिक स्थिती आणि प्रादेशिक शांततेतील भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. देशाची सीमा इराक, सीरिया, इस्रायल आणि पॅलेस्टिनी प्रदेशांशी लागून आहे. हशेमाइट राजघराणे सुमारे 1400 वर्षांपासून येथे सत्तेत आहे. किंग अब्दुल्ला II यांचे वंशपरंपरागत नाते प्रेषित मोहम्मद यांच्या कुटुंबाशी जोडले जाते. फिलिस्तीन-इस्रायल संघर्षासह अनेक अरब संघर्षांमध्ये जॉर्डनने मध्यस्थीची भूमिका बजावली आहे.
Sharing my remarks during meeting with His Majesty King Abdullah II of Jordan.@KingAbdullahIIhttps://t.co/KvRB9zkeX8
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2025
अरब जगतात प्रभाव वाढवण्यासाठी जॉर्डन महत्त्वाचा
पश्चिम आशियातील एक जिओपॉलिटिकल हब म्हणून जॉर्डनचे महत्त्व वाढत आहे. भारतासाठी जॉर्डनशी संबंध दृढ करणे, म्हणजे इतर अरब राष्ट्रांमध्येही आपली पकड मजबूत करण्याचा मार्ग मोकळा करणे. पीएम मोदींचा दौरा अशा वेळी झाला आहे, जेव्हा भारत आणि जॉर्डन राजनैतिक संबंधांचे 75 वर्षे साजरे करत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी भविष्यासाठी 8 मुद्द्यांचा संयुक्त दृष्टीकोन मांडला आहे.
यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे :
- व्यापार व आर्थिक सहकार्य
- खत आणि शेती
- माहिती तंत्रज्ञान
- आरोग्य सेवा
- पायाभूत सुविधा
- क्रिटिकल व स्ट्रॅटेजिक मिनरल्स
- सिव्हिल न्यूक्लियर सहकार्य
- लोक-ते-लोक संबंध
- व्यापार संबंधही भक्कम
जॉर्डनचा भारत चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे
2023-24 मध्ये द्विपक्षीय व्यापार: 2.875 अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे 25,858 कोटी रुपये)
भारताकडून निर्यात: 1.465 अब्ज डॉलर
इलेक्ट्रिकल उत्पादने, धान्य, केमिकल्स, पेट्रोलियम, ऑटो पार्ट्स
जॉर्डनकडून आयात: खत, फॉस्फेट, फॉस्फोरिक अॅसिड
याशिवाय, अनेक भारतीय कंपन्यांचे प्रकल्प जॉर्डनमध्ये कार्यरत आहेत.