रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 10:34 IST2025-10-16T10:31:42+5:302025-10-16T10:34:20+5:30
सप्टेंबरमध्ये चीननंतर भारत रशियाचा कच्च्या तेल खरेदीचा दुसरा मोठा खरेदीदार बनला आहे.

रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
नवी दिल्ली - भारतरशियाकडून आता तेल खरेदी करणार नाही असा मोठा दावा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दुसरीकडे रशियाचे उपपंतप्रधान अलेक्जेंडर नोवाक यांनी भारत सातत्याने रशियाच्या तेल खरेदी पुरवठा यादीत समाविष्ट आहे असं म्हटलं आहे. भारत आता रशियन तेल खरेदीसाठी केवळ रुबलच नाही चिनी चलन युआनमध्येही पेमेंट करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सरकारी न्यूज चॅनल TASS ला दिलेल्या एका मुलाखतीत रशियाचे उप-पंतप्रधान अलेक्जेंडर नोवाक म्हणाले की, भारताने रशियाच्या तेल खरेदीत आता काही पेमेंट चिनी युआनमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश व्यवहार अजूनही रशियन चलन रुबलमध्ये सुरू आहे असं त्यांनी सांगितले. जुन्या रिपोर्टनुसार, भारत रशियाकडून तेल खरेदीसाठी भारतीय चलन रूपयामध्ये पेमेंट करत होता. सप्टेंबरमध्ये चीननंतर भारत रशियाचा कच्च्या तेल खरेदीचा दुसरा मोठा खरेदीदार बनला आहे. २०२२ मध्ये युक्रेनवर रशियाने आक्रमण केल्यानंतर पाश्चात्य देशांच्या निर्बंधांना तोंड देण्यासाठी युआन, यूएई चलन दिरहमसह पर्यायी चलनाचा वापर करण्यात रशियाने सुरुवात केली. ज्यावर आधी अमेरिकन डॉलरचे वर्चस्व होते.
...तेव्हा रशियाकडून तेल खरेदी वाढवली
भारत हा पारंपारिकरित्या कच्च्या तेलासाठी मिडिल ईस्टवर निर्भर आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर रशियावर हल्ला केल्यानंतर भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी सुरू केली. यामागे प्रमुख कारण म्हणजे अत्यंत माफक दरात रशियाने भारताला कच्चे तेल उपलब्ध करून दिले. पाश्चात्य देशातील निर्बंध आणि युरोपातील मागणी कमी झाल्याने रशियाच्या तेलावर भारताला बरीच सूट मिळाली. त्यामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवली. कमी कालावधीत भारताने रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेल खरेदीत १ टक्क्यावरून ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वैयक्तिकरित्या याबाबत आश्वासन दिल्याचे ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले. मात्र या दाव्यावर भारत सरकारने कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी मॉस्कोवर दबाव आणण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना या पावलामुळे बळकटी मिळेल. भारत तेल खरेदी करणार नाही असं ट्रम्प यांनी म्हटलं.