"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 08:03 IST2025-08-04T08:03:19+5:302025-08-04T08:03:54+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका जवळच्या वरिष्ठ सहाय्यकाने आता रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर टीका केली आहे.

"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून अमेरिका सतत भारताला कोंडीत पकडत आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका जवळच्या वरिष्ठ सहाय्यकाने आता रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर टीका केली आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारताने रशियाला अप्रत्यक्षपणे युद्धासाठी निधी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जेव्हा ट्रम्प प्रशासन मॉस्कोकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवत आहे, अशा वेळी त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे.
ट्रम्प यांच्या सर्वात प्रभावशाली सल्लागारांपैकी एक असलेले स्टीफन मिलर म्हणाले की, ट्रम्प यांना स्पष्टपणे वाटते की भारताने रशियन तेल खरेदी करणे थांबवावे. "त्यांनी (ट्रम्प) अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की रशियाकडून तेल खरेदी करून भारताला या युद्धासाठी निधी पुरवत आहे,जे अजिबात स्वीकारार्ह नाही," मिलर यांनी संडे मॉर्निंग फ्युचर्समध्ये हे वक्तव्य केले.
फॉक्स न्यूजवर बोलताना ट्रम्प यांचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ, डॅन मिलर यांनी रशियासोबतच्या भारताच्या तेल व्यापाराच्या प्रमाणाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. "रशियन तेल खरेदीच्या बाबतीत भारत चीनशी जोडलेला आहे हे जाणून लोकांना आश्चर्य वाटेल," असे ते म्हणाले. मात्र, मिलर यांनी पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंध चांगले असल्याचेही नमूद केले.
ट्रम्प यांचा भारतावर थेट हल्ला
डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० जुलै रोजी भारतीय उत्पादनांवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली. भारताने रशियन शस्त्रे आणि तेल खरेदी सुरू ठेवल्यास अमेरिकेने संभाव्य दंड आकारण्याचा इशाराही दिला. कर घोषणेनंतर लगेचच, ट्रम्प यांनी भारत-रशिया संबंधांवर हल्लाबोल केला. त्यांनी दोन्ही देशांना "मृत अर्थव्यवस्था" म्हटले आणि स्पष्ट शब्दात सांगितले की, भारत रशियासोबत काय करतो याची त्यांना पर्वा नाही.
ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, जर रशिया युक्रेनसोबत शांतता करार करण्यास सहमत नसेल, तर रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या सर्व देशांकडून होणाऱ्या आयातीवर ते मोठ्या प्रमाणात कर लादण्याचा विचार करतील. त्याच वेळी, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही भारताच्या मॉस्कोसोबतच्या वाढत्या संबंधांवर टीका केली.
भारताची रशियन तेलावरील वाढती निर्भरता
गेल्या काही वर्षांत भारताच्या रशियन तेल आयातीत लक्षणीय वाढ झाली आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, २०२१ मध्ये युक्रेन युद्धापूर्वी, भारताच्या एकूण तेलाच्या फक्त ३% तेल रशियातून येत होते. आता ही संख्या त्याच्या एकूण तेल आयातीच्या ३५% ते ४०% पर्यंत वाढली आहे.