भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 07:50 IST2025-08-05T07:49:40+5:302025-08-05T07:50:09+5:30
व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भारत आणि चीन हे दोन्ही देश जवळपास सारख्याच प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करतात आणि ही गोष्ट अनेक लोकांना धक्कादायक वाटू शकते.

भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
न्यूयॉर्क : भारत स्वतःला जगातील अमेरिकेच्या सर्वांत जवळच्या मित्रांपैकी एक म्हणून जगापुढे सादर करतो, परंतु प्रत्यक्षात तो अमेरिकन उत्पादनांवर मोठे शुल्क लावतो, स्थलांतर धोरणांमध्ये “फसवणूक” करतो आणि रशियाकडून खरेदी केलेल्या तेलामुळे युक्रेन युद्धाला मदत करतो, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार स्टीफन मिलर यांनी केला आहे.
व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भारत आणि चीन हे दोन्ही देश जवळपास सारख्याच प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करतात आणि ही गोष्ट अनेक लोकांना धक्कादायक वाटू शकते.
भारत आमच्या उत्पादनांना त्यांच्या बाजारात प्रवेश देत नाही, उलटे ते आमच्यावर मोठे शुल्क लादतात. आम्हाला हेदेखील माहीत आहे की ते इमिग्रेशन धोरणांमध्ये खूप फसवणूक करतात, जे अमेरिकन कामगारांसाठी खूप हानिकारक आहे. आणि अर्थातच, आपण पुन्हा बघतोच आहोत की भारताची रशियाकडून तेल खरेदी सुरूच आहे, असे ते पुढे म्हणाले.