परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 19:06 IST2025-11-01T19:03:03+5:302025-11-01T19:06:28+5:30
भारताने २०१४ नंतर आयनी एअरबेसवर काही सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानेही तैनात केली होती.

परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
दुशांबे - भारतीय लष्कराने ताजिकिस्तान येथील महत्त्वाचं एअरबेस रिकामे केले आहे. भारताने या एअरबेसचा वापर १९९० च्या दशकात अफगाणिस्तानात नॉर्दन आघाडीचं समर्थन करण्यासाठी केला होता. त्यावेळी भारताने या एअरबेसद्वारे उत्तरी आघाडीचे प्रमुख आणि पंजशीरचे सिंह म्हणून ओळखले जाणारे अहमद शाह मसूद यांचे प्राण वाचवले होते. मात्र २०२२ मध्ये ताजिकिस्तानातील या एअरबेसवरून भारताला आपले सैन्य आणि साहित्य पुन्हा परत बोलवावे लागले आहे. याचा खुलासा आता समोर झाला आहे. या प्रकरणावर अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया नाही.
४ वर्षापूर्वी करार संपला होता...
रिपोर्टनुसार, राजधानी दुशांबेपासून सुमारे १० किलोमीटर पश्चिमेला असलेल्या आयनी एअरबेसचा विकास आणि संयुक्त ऑपरेशनसाठी भारत- ताजिकिस्तानमधील करार जवळजवळ चार वर्षांपूर्वी संपला. त्यानंतर ताजिकिस्तानने कराराचे नूतनीकरण करण्यास नकार दिला, ज्यामुळे भारताला आयनी एअरबेसवरून सैन्य पुन्हा भारतात बोलवावे लागले. भारताने या ठिकाणाहून वैद्यकीय आणि देखरेखीच्या कारवायांसह अनेक गैरलष्करी ऑपरेशन्स करणे सुरू केले होते. मागील २ दशकांमध्ये भारताने ताजिकिस्तानच्या आयनी एअरबेसच्या विकास आणि सुधारणेसाठी जवळपास १० कोटी डॉलर खर्च केलेत. हा एअरबेस सोव्हियत काळात बनला होता. याच्या दुरुस्तीत रनवे मजबूत केला आणि लांबी वाढवली होती, जेणेकरून लढाऊ विमाने आणि एअर कार्गो वाहतुकीसाठी येथून विमान उड्डाण घेता येतील. त्यात मजबूत शेल्टर, फ्यूल डेपो, एक एअर ट्रॅफिक कंट्रोल फॅसिलिटीचं बांधकाम करण्यात आले होते.
भारताने २०१४ नंतर आयनी एअरबेसवर काही सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानेही तैनात केली होती. त्याशिवाय भारताची एक सैन्य तुकडीही या भागात सज्ज असायची, त्यापैकी बहुतेक जण लष्कर आणि हवाई दलातील सैनिक होते. बऱ्यादचा २०० पर्यंत भारतीय कर्मचारी या एअरबेसवर तैनात केले जायचे. मात्र आता भारतीय कर्मचारी आणि सर्व साहित्ये २०२२ पर्यंत पुन्हा भारतात आणण्यात आली आहेत. भारताचे हे धोरणात्मक अपयश आहे अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे तर कराराची मुदत संपल्यानंतर भारताने एअरबेसवरून माघार घेतली असा सरकारचा दावा आहे.
भारतासाठी किती महत्त्वाचा एअरबेस?
आयनी एअरबेसवरून भारतानं माघारी परतणे हा एक मोठा धक्का मानला जात आहे. हा भारताच्या परदेशातील लष्करी तळांपैकी एक होता. येथून भारत केवळ अफगाणिस्तानच नव्हे तर पाकिस्तान आणि चीनवरही लक्ष ठेवत असे. हा एअरबेस पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या सीमेवर असलेल्या अफगाणिस्तानच्या वाखान कॉरिडॉरपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर आहे. जर पाकिस्तानने पीओके ताब्यात घेतले नसते तर ताजिकिस्तान आपला शेजारी देश असता. आयनी एअर बेसवरून एसयू-३० एमकेआय सारखी भारतीय लढाऊ विमाने पेशावर किंवा इस्लामाबादलाही लक्ष्य करू शकतात. चीनच्या शिनजियांग प्रांताशी असलेली त्याची सीमा देखील शत्रूंसाठी दुहेरी आव्हान निर्माण करू शकते.