Imran Khan's party leader on the same stage with international terrorist | काश्मीरप्रश्नी इम्रान खानच्या पक्षाचे नेते आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यासोबत एकाच मंचावर

काश्मीरप्रश्नी इम्रान खानच्या पक्षाचे नेते आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यासोबत एकाच मंचावर

इस्लामाबाद : दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केल्याचा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे मंत्री अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेल्यासोबत एकाच मंचावर दिसून आले आहेत. 


अमेरिकेने दहशतवादी मौलाना फजलूर रहमान खलील याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. या खलीलसोबत पाकिस्तानच्या नेत्यांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानी पत्रकार आसिफ शहजाद यांनीच हा फोटो व्हायरल केला आहे. हा फोटो सोमवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या काश्मीर प्रकरणावरील एका कार्यक्रमाचा आहे. यामध्ये खान यांच्या पीटीआय पक्षाचे पाकव्याप्त काश्मीरचे अध्यक्ष  मसूद खान  आणि सूचना व प्रसारणचे खान यांचे सहाय्यक फिरदौस आशिक अवान यांच्यासह पक्षाचे अन्य नेते आहेत. 


या मंचावर हरकत-उल-मुजाहिदीनचा म्होरक्या खलीलही उपस्थित होता. हा फोटो अशावेळी समोर आला आहे जेव्हा एफएटीएफने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचा विचार चालविला आहे. 
इम्रान खानच्या पक्षाला दहशतवाद्यांनीच मदत केली आहे. मात्र, पीटीआयने निवडणुकीत दहशतवाद्यांना पाकिस्तानात थारा देणार नसल्याचे म्हटले होते. यानंतर पक्षावर अनेकदा दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे आरोप झाले आहेत. खुद्द खलीलनेही इम्रान खानला समर्थन दिले होते. खलील हा इम्रान खान यांचा खंदा समर्थक असल्याचे म्हटले जाते. धक्कादायक म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला इम्रान खान य़ांनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला आहे. यामुळे गेल्या मार्चमध्ये इम्रान खानला टीका सहन करावी लागली होती. 


लादेनशी संबंध
खलीलचे अल कायदाचा म्होरक्या लादेनशी संबंध असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Imran Khan's party leader on the same stage with international terrorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.