पाकिस्तानातील नेत्यांना आता 'साध्या राहणी'ची सक्ती; प्रथमवर्ग प्रवासाला बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 15:36 IST2018-08-25T15:35:50+5:302018-08-25T15:36:43+5:30
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या राखीव अधिकारांचा उपयोग करत 51 अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च केले होते.

पाकिस्तानातील नेत्यांना आता 'साध्या राहणी'ची सक्ती; प्रथमवर्ग प्रवासाला बंदी
इस्लामाबाद- पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधानइम्रान खान व त्यांच्या मंत्रिमंडळाने राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, सरन्यायाधीश, सिनेटचे अध्यक्ष, नॅशनल असेम्ब्लीचे अध्यक्ष यांनी हवाई प्रवास करताना प्रथम वर्गातून प्रवास करु नये असा निर्णय घेतला आहे. याबरोबरच इम्रान यांच्या मंत्रिमंडळाने देशातील कार्यालयीन वेळाही बदलल्या आहेत. खान यांच्या मंत्रिमंडऴाच्या दुसऱ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना केवळ देशांतर्गत प्रवासासाठीच सरकारी विमान वापरण्याची मुभा असेल.
पाकिस्तानमध्ये कार्यालयांच्या कामाची वेळ सकाळी आठ ते दुपारी चार अशी होती आता ती सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच अशी करण्यात आली आहेत. इम्रान यांच्या कॅबिनेटने सर्व कार्यालयांमध्ये केवळ एकच म्हणजे फक्त रविवारी सुटी असेल असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शनिवारची सुटी रद्द झाली आहे.
त्याचप्रमाणे कॅपिटल अॅडमिनिस्ट्रेशन अँड डेव्हलपमेंट डिविजन हे मंत्रालय रद्द करुन त्याच्या कामाची विभागणी इतर मंत्रालयांमध्ये करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या राखीव अधिकारांचा उपयोग करत 51 अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च केले होते. सरकारी अधिकारी आणि नेते करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग करतात, उधळपट्टी करतात अशी भावना पाकिस्तानी लोकांच्या मनामध्ये अनेक वर्षांपासून आहे. पाकिस्तानातील माध्यमंही या उधळपट्टीवर आणि नेत्यांच्या श्रीमंती राहणीवर नेहमीच भाष्य करत असतात. त्यामुळे इम्रान यांनी सत्तेत आल्यापासूनच ही प्रतिमा बदलण्यासाठी नवे निर्णय घेत खर्च कमी करण्याचे निश्चित केले आहे.