इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:29 IST2025-08-06T11:29:00+5:302025-08-06T11:29:42+5:30

तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगवास झाल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानात निदर्शने सुरू आहेत.

Imran Khan supporters stage a huge protest in Pakistan, more than 500 people arrested! What happened? | इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?

इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?

पाकिस्तानातील विरोधी पक्ष तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगवास झाल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानात निदर्शने सुरू आहेत. पक्षाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ५०० हून अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेला दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी पीटीआयने देशभरात निदर्शनांचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. मात्र, पोलिसांनी पंजाबमध्ये कलम १४४ लागू केले असून, सार्वजनिक ठिकाणी चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याच कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात, पीटीआयच्या ज्येष्ठ नेत्यांनी आरोप केला आहे की सरकारकडून लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली जात आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते झुल्फी बुखारी यांनी सांगितले की, ५०० हून अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, यामध्ये खासदारांचाही समावेश आहे. त्यांनी हेही म्हटले आहे की सरकारकडून सभेवर बंदी घालणे, महामार्ग अडवणे आणि कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकण्यासारखे दडपशाहीचे प्रकार सुरू आहेत.

या निदर्शनांवर मीडिया कव्हरेजला बंदी घालण्यात आली आहे. तरीही, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये पोलीस निदर्शकांवर बळाचा वापर करताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये एक वृद्ध समर्थकाला पोलीस ओढताना दिसत आहेत, ज्याचा अनेक लोकांनी निषेध केला आहे.

पीटीआयच्या नेत्या मुसरत जमशेद चीमा यांनी या परिस्थितीवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सरकारला 'हुकूमशहा' म्हटले असून, निषेध सुरू होण्याआधीच कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सरकारवर लोकशाही दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Imran Khan supporters stage a huge protest in Pakistan, more than 500 people arrested! What happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.