इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 16:14 IST2025-12-12T16:08:50+5:302025-12-12T16:14:25+5:30
Imran Khan Updates Pakistan: असीम मुनीर यांचा इम्रान खानबद्दलचा द्वेष सर्वज्ञात आहे.

इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Imran Khan Updates Pakistan: पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख फैज हमीद यांना लष्करी न्यायालयाने १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हा निकाल म्हणजे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कट्टर विरोध करणाऱ्या पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे मोठे यश मानले जात आहे. असीम मुनीर यांचे समर्थक हे त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचे काम करत आहेत. पण इम्रान खान हे मुनीर यांच्यासाठी सर्वात मोठा अडथळा ठरत आहेत. ते तुरुंगवास भोगत असूनही, इम्रान खान यांनी मुनीर यांच्यासाठी वारंवार अडचणी निर्माण केल्या आहेत. असीम मुनीर यांचा इम्रान खानबद्दलचा द्वेष सर्वज्ञात आहे. आता मुनीर हे इम्रान खान यांच्या विरोधात लष्करी न्यायालयात खटला चालवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. इम्रान खान यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला जाऊ शकतो.
न्यूज१८ च्या वृत्तानुसार, नागरी न्यायालयात अनेक खटले सुरू असलेल्या इम्रान खान यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालवला जाऊ शकतो. सूत्रांच्या हवाल्याने या वृत्तात दावा करण्यात आला आहे की पाकिस्तानचे कायदा मंत्रालय या खटल्याची तयारी करत आहे. ९ मे २०२३ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या आधारे, इम्रान खानवर देशद्रोह, सैन्यातील जवानांची माथी भडकवणे आणि लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला करण्याचा कट रचण्याचे आरोप लष्करी न्यायालयात दाखल होऊ शकतात. इम्रान खानच्या पक्षाने, पीटीआयने आधीच भीती व्यक्त केली आहे की त्यांच्या नेत्याला लष्करी न्यायालयात खेचण्यासाठी कट रचला जात आहे.
जर असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांचे सरकार माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर लष्करी न्यायालयात देशद्रोहाचा खटला चालवण्यात यशस्वी झाले तर पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. इम्रान खानविरुद्धचा खटला अधिकृत गुपिते कायदा आणि लष्करी कायद्यांतर्गत चालवला जाईल. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सीएनएन-न्यूज१८ ला सांगितले आहे की, जनरल फैज यांच्या खटल्यातील विधाने आणि पुरावे मुनीर यांना लष्करी न्यायालयात इम्रान खानविरुद्ध खटल्यात वापरायचे आहेत. अशा परिस्थितीत आता पाकिस्तानचे राजकीय वातावरण भलतेच तापले आहे.