इम्रान खानला पत्नीसह १४ वर्षे जेल, अल-कादिर ट्रस्टशी निगडित प्रकरणात भ्रष्टाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 05:05 IST2025-01-18T05:02:39+5:302025-01-18T05:05:06+5:30
भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाचे न्या. नसीर जावेद राणा यांनी हा निकाल दिला.

इम्रान खानला पत्नीसह १४ वर्षे जेल, अल-कादिर ट्रस्टशी निगडित प्रकरणात भ्रष्टाचार
इस्लामाबाद : अल-कादिर ट्रस्टशी निगडित दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांवरून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या पत्नी बुशरी बिबी यांना अनुक्रमे १४ वर्षे व सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने शुक्रवारी सुनावली. इम्रान खान यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा तसेच बुशरा बिबी या गैरव्यवहारांमध्ये सहभागी असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.
भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाचे न्या. नसीर जावेद राणा यांनी हा निकाल दिला. इम्रान खान यांना १० लाख पाकिस्तानी रुपये (भारतीय चलनात ३ लाख १० हजार रुपये) व बुशरा बिबींना ५ लाख पाकिस्तानी रुपये (भारतीय चलनात १ लाख ५५ हजार रुपये) इतका दंड न्यायालयाने सुनावला आहे. दंड न भरल्यास, इम्रान खान यांना ६ महिन्यांची तर बुशरा बिबींना ३ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा होईल. अल-कादिर विद्यापीठाच्या जमीन जप्त करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या समर्थकांनी संसदेसमोर निदर्शने केली. इम्रान खान व बुशरा बिबींची सुटका करा, अशी निदर्शकांनी पाकिस्तान सरकारकडे मागणी केली. इम्रान खान यांनी म्हटले आहे की, आमच्याविरोधात दिलेला निकाल हा राजकीय हेतूने प्रेरित आहे. असा निकाल दिल्यामुळे न्यायालयाची प्रतिमा डागाळली आहे. (वृत्तसंस्था)
लष्कराचा रोष
बहुतांश खटल्यांत इम्रान यांची निर्दोष सुटका झाली किंवा त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लष्कराच्या इमारतींवर हल्ले केले. त्यामुळे लष्कराचा इम्रान खान यांनी रोष ओढवून घेतला.