"2020 मध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले असते तर यूक्रेन युद्ध झाले नसते, त्यांचा विजय..."! पुतिन यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 09:14 IST2025-01-25T09:14:25+5:302025-01-25T09:14:52+5:30
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेन युद्धासंदर्भात मोठे विधान केले आहे. जर अमेरिकेचे ...

"2020 मध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले असते तर यूक्रेन युद्ध झाले नसते, त्यांचा विजय..."! पुतिन यांचं मोठं विधान
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेन युद्धासंदर्भात मोठे विधान केले आहे. जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यावेळी सत्तेत असते, तर 'युक्रेन संकट' टळू शकले असते. हा संघर्ष रोखण्यासाठी आपण त्यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहोत, असे पुतिन यांनी म्हटेल आहे.
तत्पूर्वी, जर आपण सत्तेवर असतो, तर हे युद्ध झाले नसते, असे ट्रम्प यांनीही वारंवार म्हटले आहे. आता पुतिन यांनीही हेच म्हटले आहे. याच बरोबर, 2020 च्या निवडणुकीत आपला विजय दुसऱ्या पक्षाने हिरावून घेतला होता, या ट्रम्प यांच्या आरोपाचाही पुतिन यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
आम्ही युक्रेन मुद्द्यावर चर्चेसाठी तयार -
माध्यमांतील वृत्तांनुसार, पुतिन म्हणाले, "मी ट्रम्प यांच्याशी सहमत आहे, जर २०२० मध्ये त्यांचा विजय हिरावून घेतला गेला नसता, तर कदाचित २०२२ मध्ये युक्रेन संकट उद्भवले नसते. हे त्यांच्या बाबतीत चुकीचे झाले. चर्चेसंदर्भात बोलायचे तर, आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत आणि मी पुन्हा एकदा हेच बोलतो की, आम्ही युक्रेन मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहोत."
काय म्हणाले होते ट्रम्प -
तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, आपण युक्रेन युद्ध 'एका दिवसात' संपवू शकतो. तथापी, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी त्यांचे विशेष दूत कीथ केली यांना १०० दिवसांची मुदतही दिली आहे. ट्रम्प म्हणाले, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची शांततेसंदर्भात आपल्याशी बोलण्याची इच्छा आहे आणि पुतिन यांनीही तोडगा काढण्याचा प्रयत्न करायला हवा. 'मला वाटते की रशियाने तडजोड करायला हवी. कदाचित त्यांनाही तडजोड करायची आहे. माझ्या माहितीनुसार, पुतिन देखील मला भेटू इच्छितात. आपण शक्य तेवढ्या लवकर भेटू.