"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 10:44 IST2025-11-02T10:42:50+5:302025-11-02T10:44:41+5:30
ट्रम्प यांनी पुढे लिहिले, जर नायजेरियन सरकार निर्दोष ख्रिश्चनांच्या हत्या रोखण्यास अपयशी राहिले तर, अमेरिका केवळ अपली मदतच बंद करणार नाही तर शस्त्रास्त्रांसह कारवाई करेल.

"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
भारत-पाकिस्तान संघर्ष, इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध, रशिया-युक्रेन युद्ध आणि टॅरिफ वॉर, आदींमुळे सातत्याने चर्चेत असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी आपली दृष्टी आता नायजेरियाकडे वळवली आहे. त्यांनी नायजेरियाला थेट सैन्य कारवाईची धमकीच देऊन टाकली आहे. "देशात ख्रिश्चनांच्या हत्या थांबल्या नाहीत तर, अमेरिका नायजेरियाला दिली जाणारी आर्थिक मदत तत्काळ बंद करेल. तसेच, परिस्थिती सुधारली नाही तर अमेरिकेला लष्करी हस्तक्षेप करावा लागेल," असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे.
ट्रम्प यांनी पुढे लिहिले, जर नायजेरियन सरकार निर्दोष ख्रिश्चनांच्या हत्या रोखण्यास अपयशी राहिले तर, अमेरिका केवळ अपली मदतच बंद करणार नाही तर शस्त्रास्त्रांसह कारवाई करेल.
दरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला संभाव्य कारवाईसाठीही सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, “हल्ला झाला तर तो जलद, निर्णायक आणि निर्दयी असेल. जसा दहशतवादी आमच्या ख्रिश्चन बांधवांवर करतात.” एवढेच नाही तरत आता अमेरिका केवळ बोलणार नाही तर, प्रत्यक्ष कृती करेल, असा इशाराही ट्रम्प यांनी नायजेरिया सरकारला दिला आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर, नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टीनूबू यांनी ट्रम्प यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, देशात कोणत्याही धार्मिक समुदायावर संघटित अत्याचार होत नाही. माहिती मंत्री मोहम्मद इद्रीस वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना म्हटले, अमेरिकेचे आरोप दिशाभूल करणारे आहेत आणि नायजेरिया शांतता व धार्मिक सौहार्द राखण्यास कटिबद्ध आहे.
ट्रम्प नायजेरियाला ‘स्पेशल कन्सर्न कंट्री’ घोषित करत म्हणलाे, देशात ख्रिश्चनांचा अस्तित्व धोक्यात आले आहे. हजारो ख्रिश्चनांची हत्या होत असून हा कट्टर इस्लामी शक्तींनी घडवून आणलेला सुनियोजित नरसंहार आहे. त्यांनी अमेरिकन खासदारांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जगभरात ख्रिश्चनांवर अत्याचार होत असताना अमेरिका मौन धारण करणार नाही. आता ठोस पावले उचलली जातील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.