Donald Trump on Tariff: अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. रशियाकडून सुरू असलेल्या तेल आयातीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला कडक इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींना माहिती आहे की मी या व्यापारावर खुश नाही त्यामुळे आम्ही भारतावर अतिशय वेगाने आयात शुल्क वाढवू शकतो, असे खळबळजनक विधान ट्रम्प यांनी केले आहे.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
एअर फोर्स वनवर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी भारत आणि रशियाच्या ऊर्जा संबंधांवर भाष्य केले. "पंतप्रधान मोदी हे एक अतिशय चांगले व्यक्ती आहेत. पण रशियाकडून भारत ज्या प्रकारे तेल खरेदी करत आहे, त्यावर मी नाराज आहे. त्यांनी हा व्यापार थांबवावा अशी माझी इच्छा आहे. जर भारताने आपला निर्णय बदलला नाही, तर सध्या असलेल्या टॅरिफमध्ये आम्ही मोठी वाढ करू शकतो. टॅरिफ ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही समस्येचे निराकरण अवघ्या दोन मिनिटांत करू शकते," असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
ऑगस्ट २०२५ मध्ये आधीच लादले होते ५०% टॅरिफ
ट्रम्प प्रशासनाने यापूर्वीच ऑगस्ट २०२५ मध्ये भारतावर कडक कारवाई केली होती. भारतीय उत्पादनांवर २५ टक्के रेसिप्रोकल टॅरिफ आणि रशियासोबतच्या तेल व्यापारामुळे अतिरिक्त २५ टक्के दंड असे मिळून एकूण ५० टक्के आयात शुल्क लादले होते. यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार आणि संबंधांवर मोठा परिणाम झाला आहे. आता हा टॅरिफ आणखी वाढवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, पंतप्रधान मोदींनी त्यांना रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, भारताने अधिकृतपणे हा दावा फेटाळून लावला होता. नवी दिल्लीच्या मते, दोन्ही नेत्यांमध्ये अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. भारत आपल्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवणार असल्याचे संकेत दिले आहेत.
भारत-अमेरिका व्यापार चर्चेवर प्रश्नचिन्ह
गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही देशांचे प्रतिनिधी व्यापार कोंडी फोडण्यासाठी चर्चा करत आहेत. नुकत्याच झालेल्या फोन कॉलनंतर असे वाटले होते की तणाव कमी होईल, मात्र ट्रम्प यांच्या ताज्या विधानामुळे चर्चेत पुन्हा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Donald Trump warned India about increasing tariffs due to its Russian oil imports. He expressed displeasure with PM Modi. Increased tariffs were previously imposed in August 2025. Trade discussions face renewed uncertainty.
Web Summary : डोनाल्ड ट्रंप ने रूसी तेल आयात के कारण भारत पर टैरिफ बढ़ाने की चेतावनी दी। उन्होंने पीएम मोदी के प्रति नाखुशी जताई। अगस्त 2025 में पहले भी टैरिफ बढ़ाए गए थे। व्यापार वार्ता में फिर अनिश्चितता।