300 अब्ज चुकवले नाही, तर पाकिस्तानची बत्ती गुल होणार...; चिनी कंपन्यांची थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 15:46 IST2022-05-10T15:44:23+5:302022-05-10T15:46:46+5:30
जवळपास 30 चिनी कंपन्या अब्जावधी डॉलर्सच्या चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत पाकिस्तानात कार्यरत आहेत. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानातील ऊर्जा, दळणवळण, रेल्वे आणि इतरही काही क्षेत्रांमध्ये या कंपन्यांचा मोठा दबदबा आहे.

300 अब्ज चुकवले नाही, तर पाकिस्तानची बत्ती गुल होणार...; चिनी कंपन्यांची थेट धमकी
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला, आता त्याचा जवळचा मित्र म्हणवल्या जाणाऱ्या चीनकडूनच मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. जर पाकिस्तानने आपले 300 अब्ज रुपये दिले नाहीत, तर आपण पाकिस्तानचा वीज पुरवठा बंद करू, अशी उघड धमकी चिनी कंपन्यांनी पाकिस्तानला दिली आहे.
पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या दोन डझनहून अधिक चिनी कंपन्या यासंदर्भात बोलताना म्हणाल्या, आपल्याला या महिन्यात पॉवर प्लँट बंद करावे लागू शकतात. कारण, या चिनी कंपन्यांची पाकिस्तानकडे जवळपास 300 अब्ज रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी जोवर दिली जात नाही, तोवर पॉवर प्लॅन्ट बंद करू, असे या कंपन्यांनी म्हटले आहे.
जवळपास 30 चिनी कंपन्या अब्जावधी डॉलर्सच्या चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत पाकिस्तानात कार्यरत आहेत. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानातील ऊर्जा, दळणवळण, रेल्वे आणि इतरही काही क्षेत्रांमध्ये या कंपन्यांचा मोठा दबदबा आहे. पाकिस्तानचे नियोजन आणि विकास मंत्री अहसान इक्बाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी या चिनी कंपन्यांसोबत बैठक झाली. तेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला होता. मात्र, पाकिस्तानकडे याचे उत्तर नव्हते.
या स्वतंत्र चीनीवीज उत्पादक कंपन्यांच्या (IPPs) सुमारे 25 प्रतिनिधींनी अहसान इक्बाल यांच्याशी चर्चा केली. यावेळी या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे थकबाकी संदर्भात तक्रार केली. एवढेच नाही, तर लवकरात लवकर ही थकबाकी न भरल्यास, आपण काही दिवसांत आपले वीज प्रकल्प बंद करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.