अंतराळवीरांना अवकाशातील ओव्हरटाइमचे पैसे मी माझ्या खिशातून देईन: डोनाल्ड ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 14:25 IST2025-03-23T14:23:42+5:302025-03-23T14:25:09+5:30
अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना मोहिमेत २७८ दिवसांचा ओव्हरटाइम करावा लागला

अंतराळवीरांना अवकाशातील ओव्हरटाइमचे पैसे मी माझ्या खिशातून देईन: डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन: अवकाशातून परतलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना मोहिमेदरम्यान झालेल्या ओव्हरटाइमचे पैसे मी हवे तर माझ्या खिशातून भरेन, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ८ दिवसांच्या मोहिमेसाठी अवकाशात गेले होते. परंतु तांत्रिक बिघाडामुळे त्यांना अवकाशात २८६ दिवस अडकून पडावे लागले होते. अवकाशात नऊ महिने घालवल्यानंतर ते या आठवड्यात पृथ्वीवर सुखरूप परतले. त्यांना मोहिमेत २७८ दिवसांचा ओव्हरटाइम करावा लागला होता.
राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले?
ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना अंतराळवीरांना कराव्या लागलेल्या ओव्हरटाइमबाबत छेडले. अंतराळात अडकून पडावे लागल्याने त्यांना काही वाढीव वेतन दिले जाणार आहे का, असे पत्रकारांनी विचारले.
त्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कुणीही कधी मला याबाबत काहीही सांगितलेले नाही. पण अंतराळवीरांना ओव्हरटाइमचे पैसे द्यावे लागत असतील तर मी स्वत:च्या खिशातून देईन.
इलॉन मस्क यांचेही मानले आभार
- बचाव दलाने या दोघांना या आठवड्यात स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलने पृथ्वीवर परत आणले. ट्रम्प यांनी टेस्ला, स्पेसएक्सचे प्रमुख आणि गव्हर्नमेंट एफिशियन्सी डिपार्टमेंटचे प्रमुख उद्योगपती इलॉन मस्क यांचेदेखील आभार मानले.
- ट्रम्प म्हणाले की, मला वाटते आपल्याकडे मस्क नसते तर? या दोघांना तिथे आणखी बराच काळ अडकून पडावे लागले असते. त्यांना तिथून परत आणण्यासाठी मग कोण गेले असते?
- प्रसारमाध्यमांच्या एका प्रतिनिधीने ट्रम्प यांना माहिती दिली की, या दोघांना अवकाशात घालवलेल्या प्रत्येक दिवसासाठी ५ डॉलर प्रतिदिन प्रमाणे १,४३० डॉलरचे जादा वेतन दिले आहे. अंतराळवीरांना नासाच्या इतर अंतराळवीरांप्रमाणेच वेतन मिळते. कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ४० तास काम करावे लागते. ओव्हरटाईम, शनिवार-रविवार किंवा सुट्ट्यांसाठी जादा पैसे मिळत नाहीत.
दोघांना किती पैसे मिळाले?
नासाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अंतराळीवीरांना वार्षिक १,५२,२५८ डॉलर इतके वेतन दिले जाते. अवकाशातील मोहिमेतील ओव्हरटाइममुळे त्यांना २८६ दिवसांसाठी १,४३० डॉलर इतके अधिक वेतन
देण्यात आले.