"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 20:14 IST2025-07-29T20:13:04+5:302025-07-29T20:14:28+5:30
Nimisha Priya : निमिषाने हत्या केलेल्या तलाल अब्दो महदीच्या भावाने येमेनच्या अटर्नी जनरल यांना अधिकृतपणे एक पत्र लिहिलं आहे.

"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
Nimisha Priya Case : येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाच्या फाशीच्या शिक्षेची आता लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे, निमिषाने हत्या केलेल्या तलाल अब्दो महदीच्या भावाने येमेनच्या अटर्नी जनरल यांना अधिकृतपणे एक पत्र लिहिलं आहे. तलालच्या भावाने लिहिलेल्या पत्रानुसार, "आमचं कुटुंब 'दिनाह' (ब्लड मनी) घेण्यासाठी तयार नाही, त्यामुळे फाशीची शिक्षा लवकरच निश्चित केली जावी." निमिषाला वाचवण्यासाठी ग्रँड मुफ्ती अबूबकर खूप सक्रिय आहेत. मुफ्तींनीच फाशीची शिक्षा स्थगित केली होती, पण आता तलालच्या कुटुंबाने ज्या प्रकारे ठाम भूमिका घेतली आहे, त्यामुळे अबूबकरही निमिषाला माफी मिळवून देऊ शकणार नाहीत, असं बोललं जात आहे.
तलालचा भाऊ अब्दुल फतह महदी यांनी अटर्नी जनरल यांना विनंती केली आहे की, "या निर्णयात जाणूनबुजून उशीर केला जात आहे, जे न्यायाच्या विरोधात आहे. आम्ही मागणी करतो की याची तात्काळ अंमलबजावणी केली जावी."
पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
अब्दुलने यमनच्या अटर्नी जनरल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "२०२० मध्येच निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०२३ मध्ये १७७ क्रमांकाच्या पत्राद्वारे राजकीय परिषदेने याला मान्यताही दिली. २०२५ मध्ये यासाठी तारीखही निश्चित करण्यात आली होती. अशा परिस्थितीत आता याला जास्त दिवस रोखून ठेवणे योग्य नाही."
अब्दुल फतह महदी यांचं म्हणणं आहे की, "निमिषा प्रकरणात अंतिम आणि बंधनकारक निर्णयही आलेला आहे. तरीही 'ब्लड मनी'च्या नावाखाली याला थांबवलं गेलं आहे. हे योग्य नाही. आम्हाला 'किसास' (इस्लामिक कायद्यानुसार बदला घेण्याचा अधिकार) अंतर्गत न्याय हवा आहे. निसर्गात सर्व लोकांना न्यायाचा अधिकार प्राप्त आहे."
कुटुंबाला 'ब्लड मनी' मान्य नाही!
अब्दुल फतह यांच्या मते, त्यांच्या कुटुंबाला ब्लड मनी स्वीकारणं मान्य नाही. "यासाठी जे कोणी लोक प्रयत्न करत आहेत, ते आपली ऊर्जा वाया घालवत आहेत," असं ते म्हणाले. फतेह यांचं म्हणणं आहे की, "काही लोक निमिषाचं कुटुंब आणि तिच्या समर्थकांची दिशाभूल करत आहेत."
अब्दुलच्या मते, "निमिषाला माफी दिली जाऊ शकत नाही, कारण तिने गुन्हेगारीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. हत्येनंतर तिने जे केलं, ते ऐकूनच लोक दुःखी होतील. माझ्या भावाचं रक्त काही बाजारातील वस्तू नाही, जी लोक विकत घेऊ शकतील. ते कधीही विकलं जाणार नाही."
आता फारसे पर्याय नाहीत!
तलालच्या कुटुंबाने ज्या प्रकारे अटर्नी जनरलला पत्र लिहिलं आहे, त्यावरून हे स्पष्ट झालं आहे की निमिषाकडे आता फारसे पर्याय उरलेले नाहीत. येमेनच्या कायद्यानुसार, केवळ 'ब्लड मनी'च्या माध्यमातूनच निमिषाचा जीव वाचू शकतो. पण 'ब्लड मनी' देखील कोणत्याही दबावाशिवाय स्वीकारल्यास माफी दिली जाते.
'ब्लड मनी'चा मार्ग बंद झाल्यास, येमेन सरकार फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत अंतिम निर्णय घेईल. यापूर्वी १६ जुलै ही तारीख निश्चित केली होती, पण त्यावेळी निर्णय स्थगित करण्यात आला होता.