भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 07:51 IST2025-09-22T07:51:20+5:302025-09-22T07:51:52+5:30

म्हणे,  ७ युद्धे थांबविली आता तरी नोबेल द्यायला हवा, ७ युद्धांमधील ६० टक्के संघर्ष हे आपण व्यापाराच्या माध्यमातून मिटवले असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

I stopped the India-Pakistan war; US President Donald Trump claims more than 40 times, now at least give me the Nobel | भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारत-पाकिस्तान संघर्ष व्यापाराच्या माध्यमातून थांबवल्याचा दावा करीत आपण जगभरातील सात युद्धे थांबविल्याबद्दल आपल्याला ‘नोबेल’ मिळायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे ट्रम्प यांनी आतापर्यंत ४०हून अधिक वेळा श्रेय घेतले आहे.

गेल्या १० मे रोजी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सर्वप्रथम घोषणा केली होती. रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर भारत व पाकिस्तान तत्काळ व संपूर्ण युद्धबंदीवर सहमत झाल्याचा दावा त्यांनी केला होता. नंतरच्या काळात त्यांनी आपल्या कथित मध्यस्तीबद्दल सातत्याने दावे करीत या दोन्ही देशांतील तणाव निवळावा म्हणून मदत केल्याचा पुनरुच्चार केला आहे. 

...म्हणे ही युद्धे थांबवली
शनिवारी अमेरिकन कॉर्नरस्टोन इन्स्टिट्यूट फाऊंडर्स डिनरच्या वार्षिक समारंभात ट्रम्प यांनी आपण जागतिक पातळीवर करीत असलेल्या कामगिरीमुळे अमेरिकेला आतापर्यंत कधीही मिळाला नाही असा उच्च दर्जाचा सन्मान मिळत असल्याचा दावा केला. भारत-पाकिस्तान, थायलंड- कंबोडिया, आर्मेनिया -अझरबैजान, कोसोवो-सर्बिया, इस्रायल -इराण, इजिप्त-इथिओपिया, रवांडा-कांगो हे संघर्ष थांबवल्याचा दावा केला. 

भारताची स्पष्ट भूमिका
एकीकडे ट्रम्प यांचे हे दावे सुरू असताना भारताने मात्र आपल्या कोणत्याही व्यवहारात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही असे सांगत हे दावे खोडून काढले आहेत. तरीही ट्रम्प यांनी भारत-पाक संघर्षाबाबत श्रेय घेणे सोडलेले नाही.

...मी त्यांना बजावले
ट्रम्प म्हणतात, ‘भारताला मी बजावले की, भारत-पाक या दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत. तुम्ही युद्ध सुरू कराल तर तुमच्याशी कुणीच व्यापार करणार नाही. बस, मी एवढेच बोललो आणि दोन्ही देश थांबले.’ ७ युद्धांमधील ६० टक्के संघर्ष हे आपण व्यापाराच्या माध्यमातून मिटवले असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

Web Title: I stopped the India-Pakistan war; US President Donald Trump claims more than 40 times, now at least give me the Nobel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.