पाकिस्तानचा दुतोंडी स्वभाव पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे. शनिवारी (६ जुलै) पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॅप्टन करनाल शेर खान यांना श्रद्धांजली अर्पण केली. विशेष म्हणजे, हे तेच कॅप्टन खान आहेत, ज्यांच्या मृतदेहाला कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानने ओळखण्यासही नकार दिला होता.
कारगिल युद्धात पाकिस्तानच्या सैन्यातर्फे लढताना मरण आलेल्या कॅप्टन खान यांचा २६वा शहीद दिन पाकिस्तानने मोठ्या सन्मानाने साजरा केला. परंतु, भारतातील एका जुन्या अधिकृत निवेदनानुसार, १९९९मध्ये जेव्हा टायगर हिलजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता, तेव्हा पाकिस्तानने तो त्यांचा सैनिक असल्याचे मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
पाकिस्तानने प्रतिसाद दिलाच नाही!
भारतीय दूतावासाने १५ जुलै १९९९ रोजी वॉशिंग्टनमध्ये एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये नमूद करण्यात आले होते की, भारताने १२ जुलै रोजी पाकिस्तानशी संपर्क साधून दोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे मृतदेह परत देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र पाकिस्तानकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते की, पाकिस्तान आपल्या सैनिकांची ओळख पटवण्यास तयार नाही, कारण त्यामुळे करगिलमधील त्यांच्या लष्करी सहभागाची पोलखोल होईल. ही कृती केवळ त्यांच्या सैनिकांप्रतीच नव्हे, तर संपूर्ण लष्कराच्या परंपरांप्रती देखील अनादर ठरत होती.
कसा स्वीकार केला मृतदेह?
शेवटी १३ जुलैला इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसने (ICRC) भारताशी संपर्क केला आणि सांगितले की, पाकिस्तानने त्यांच्याशी बोलून मृतदेह भारताकडून परत घेण्याची विनंती केली आहे. आज ज्या कॅप्टन शेर खान यांचा गौरव पाकिस्तान करत आहे, त्यांच्या बलिदानालाही एका काळी पाकिस्तानने नाकारले होते.