पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 16:05 IST2025-10-23T16:04:18+5:302025-10-23T16:05:00+5:30
या प्रकरणावर तुर्कीतील कोर्ट ऑफ कॅसेशनने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे....

पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
पती-पत्नीमध्ये टोपणनावे (निकनेम) ठेवणे सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र काहीवेळा याच टोपन नावांमुळे नातेही तुटू शकते. असेच एक प्रकरण तुर्कीतून समोर आले आहे. येथे एका व्यक्तीला त्याच्या मोबाईल फोनमध्ये पत्नीचे नाव 'टॉमबेक' (Tombek) अर्थात 'जाड/स्थूल' (मोटी) म्हणून सेव्ह करणे अत्यंत महागात पडले आहे.
या प्रकरणावर तुर्कीतील कोर्ट ऑफ कॅसेशनने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पतीने आपल्या पत्नीचे नाव अपमानास्पद पद्धतीने सेव्ह केल्याने, तिला भौतिक (Material) आणि नैतिक (Moral) नुकसानापोटी, भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
नेमकं काय घडलं? -
तुर्कीतील एका कोर्टात घटस्फोटाचा (तलाक) खटला सुरू असताना ही बाब समोर आली. पतीने आपल्या मोबाईलमध्ये पूर्वाश्रमीच्या पत्नीचे नाव 'टॉमबेक' ('Chubby' म्हणजेच 'जाड' अथवा मोटी) या नावाने सेव्ह केले होते. पत्नीने कोर्टात दावा केला होता की, हे अपमानजनक टोपणनाव आपल्या वैवाहिक संबंधांना कमी लेखणारे होते.
तुर्किएतील एका वृत्त संकेतस्थळाच्या माहितीनुसार, उसाक शहरातील कोर्टाने पतीने पत्नीचे नाव 'जाड' (Chubby) म्हणून नोंदवल्याबद्दल त्याला दोषी ठरवले आणि त्याला माजी पत्नीला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
खरेतर, कोर्टाचा हा निर्णय आता एक कायदेशीर उदाहरण (Legal Precedent) बनला आहे. यामुळे, तुर्कीतील पतींना आपल्या पत्नीचे नाव मोबाईलमध्ये टोपन नावाने सेव्ह करण्यापूर्वी चार वेळा विचार करावा लागेल. महत्वाचे म्हणजे, या घटनेनंतर सोशल मीडियावरही चर्चेला सुरुवात झाली आहे.