Howdy Modi Time for a decisive battle against terrorism says PM Modi | Howdy Modi: दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाईची वेळ आली आहे - मोदी

Howdy Modi: दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाईची वेळ आली आहे - मोदी

ह्युस्टन : दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे टीका करताना ते म्हणाले की, काही देश दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

आपला देश ज्यांच्याकडून सांभाळला जात नाही, त्यांना त्रास होतो. द्वेष हेच त्यांचे शस्त्र बनले आहे. दहशतवाद्यांचे ते समर्थन करतात. दहशतवाद्यांना त्यांनी आश्रय दिला आहे. हीच त्यांची जगात ओळख आहे. अमेरिकेत झालेला ९/११ हल्ला किंवा भारतातील २६/११ हल्ला हे त्यांचे कट कारस्थान असते. आता दहशतवादाविरुद्ध व त्यांना पोसणाऱ्यांविरुद्ध पूर्ण शक्तिनिशी उभे राहण्याची वेळ आली आहे. ट्रम्प या लढाईत सर्व शक्तिनिशी उभे आहेत. त्यांना आपण उभे राहून शुभेच्छा द्याव्यात.

ह्युस्टन येथील एनआरजी स्टेडियममध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर भाषणाला मोदींनी हिंदीतून सुरूवात करतानाच तेथील जनसमुदाय, उत्साह, जल्लोष याचा उल्लेख केला. हे दृश्य, हा माहोल अकल्पनीय आहे. टेक्सासच्या इतिहासात हे अविश्वसनीय आहे. हा अपार जनसमूह उपस्थित आहे. ही संख्या गणितात मोजता येणारी नाही. नवा इतिहास घडतो आहे. ट्रम्प यांचे येणे हे अमेरिकेच्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. अमेरिकेत भारताच्या सामर्थ्याचा डंका आहे. १३० कोटी भारतीयांचा हा सन्मान आहे. लोकप्रतिनिधी व अनेक जण येथे आलेले आहेत. सर्वांचे स्वागत व अभिनंदन. येथे येण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी नोंदणी केली होती. हजारोंना येथे येता आले नाही. त्यांची मी माफी मागतो.

यावेळी मोदी यांनी ह्युस्टनची प्रशंसा केली. पुढे ते म्हणाले की, मोदी हा एकटा काहीही नाही. १३० कोटी आदेशावर तो काम करणारा आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या तीन पट संख्येतील मतदार भारतात होते व त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले. त्यात १८ दशलक्ष युवक आहेत व त्यांनी प्रथमच मतदान केले. सर्वांत जास्त महिलांनी मतदान केले. सर्वांत जास्त महिला निवडून आल्या. हा नवा विक्रम आहे. मागील ६० वर्षांत हे सरकार प्रथमच सर्वांत जास्त बहुमताने सत्तेवर आलेले आहे. हे केवळ भारतवासीयांमुळे घडले. धैर्य ही भारताची ओळख आहे. आता आम्ही विकासाला अधीर झालो आहोत. भारतात सर्वांत जास्त चर्चेतील शब्द विकास हा आहे. सबका साथ सबका विकास हे भारताचे धोरण आहे. आम्हाला नव्या भारताचे स्वप्न साकारायचे आहे. आम्ही आता आम्हालाच आव्हान देत आहोत. ७० वर्षांत देशातील रूरल सॅनिटेशन ३८ टक्के होते. ते आता ९९ टक्के झाले आहे. स्वयंपाकाचा गॅस ९५ टक्के पोहोचवण्यात आला आहे. पाच वर्षांत १५ कोटी लोकांना गॅस कनेक्शन दिले. पाच वर्षांत आम्ही ग्रामीण भागांत २००० किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते बांधले. १०० टक्के कुटुंब बँकिंगशी जोडले. त्यांच्या मूलभूत गरजा भागल्याने ते आता मोठी स्वप्ने बघत आहेत.

सर्व छान चालले आहे
मोदी यांनी आपल्या भाषणात मराठी व इतर भारतीय भाषांमधून प्रेक्षकांना त्यांचे हालहवाल विचारले. सर्व छान चालले आहे, असे ते मराठीत म्हणाले. इतरही अनेक भारतीय भाषांमधून त्यांनी संबोधित करताच उपस्थितांनी स्टेडियम डोक्यावर घेतले.

वही तो मेरे हौसलोंका मिनार है...
भारतात खूप काही बदल होत आहेत. अजूनही काही घडवायचे आहेत. मी याबाबत एक कविता लिहिली होती. तिच्या दोन ओळी सांगतो, असे म्हणून मोदींनी त्या ओळी सांगितल्या-
वो जो मुश्किलोंका अंबर है
वही तो मेरे हौसलोंका मिनार है

कमी खर्चात डाटा
जगात सर्वांत स्वस्त इंटरनेट डाटा भारतात उपलब्ध आहे. १०,००० सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. एका आठवड्यात पासपोर्ट घरी येतो. व्हिसा मिळवण्यातील अडचणी मिटवण्यासाठी ई-व्हिसाची सोय केली आहे. नवीन संपत्तीची २४ तासांत नोंदणी होते. पाच दशलक्ष लोकांनी ऑनलाईन आयटीआर भरला.

येत्या २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती आहे. भारत ती प्रचंड उत्साहात साजरी करणार आहे.

भारताने अनेक जुने कायदे रद्द केले. करांच्या अनेक गुंतागुंतीला निरोप दिला आहे. एक देश, एक कराचे स्वप्न साकार केले. दोन-तीन वर्षांत ३.५ लाख संशयित कंपन्यांना निरोप दिला. ८ कोटी फेक नेम्सला निरोप दिला.

भारताने ७० वर्षांच्या कलम ३७०ला निरोप दिला. कलम ३७० ने लोकांना विकास व समान अधिकारांपासून वंचित ठेवले होते. भारताच्या घटनेने जे अधिकार इतरांना दिले ते आता जम्मू-काश्मीरमधील महिला व नागरिकांना दिले आहेत. लोकसभा व राज्यसभेने याला मंजुरी देण्यासाठी तासनतास चर्चा केली. बहुमत नसताना राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमताने प्रस्ताव संमत केला. यासाठी सर्वांनी भारताच्या खासदारांना उभे राहून शुभेच्छा द्याव्यात.

हे दिवस कमी आर्थिक तुटीचे आणि जास्त उत्पन्न घेण्याचे आहेत. काल मी ऊर्जा क्षेत्रातील सीईओंना भेटलो. त्यांच्यामध्ये मला खूप उत्साह दिसला. कार्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यामुळे अमेरिकेतच नाही तर जगात समाधान व्यक्त होत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ट्रम्प यांच्याशी माझी पुन्हा चर्चा होईल. त्यात सकारात्मक निर्णय होतील, अशी मला आशा आहे.

ट्रम्प हे आर्ट ऑफ डीलमध्ये ख्यातनाम आहेत. त्यांच्याकडून मी हे कौशल्य शिकत आहे, असे मोदी म्हणाले. तुम्ही सर्व भारताच्या चांगल्या भवितव्यासाठी ड्रायव्हिंग फोर्स आहात, असेही ते म्हणाले.

भारतातील सर्व खासदारांसाठी उभे राहून शुभेच्छा
भारतातील सर्व प्रकारच्या विकासाचा गौरव करावा. कलम ३७० रद्द करण्यासाठी जे प्रयत्न केले त्यासाठी भारतातील सर्व खासदारांसाठी सर्व प्रेक्षकांनी उभे राहून शुभेच्छा द्याव्यात, असे मोदी यांनी म्हणताच स्टेडियममधील सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या.

अब की बार ट्रम्प सरकार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरजी स्टेडियममध्ये ट्रम्प यांना भाषणासाठी आमंत्रित केले. यावेळी त्यांनी अब की बार ट्रम्प सरकार हा नाराही दिला.

मोदी म्हणाले की, ट्रम्प यांचा कोणताही परिचय करून देण्याची गरज नाही. मी त्यांचे नेतृत्व, अमेरिकेबाबतची त्यांची प्रबळ इच्छा व अमेरिकेची वाटणारी त्यांना चिंता याबाबत मी त्यांची प्रशंसा करतो. मी जेव्हा त्यांना प्रथम भेटलो तेव्हा त्यांनी सांगितले होते की, भारताचा सच्चा मित्र व्हाईट हाऊस आहे.

मोदी हे मागील आठवड्यात ६९ वर्षांचे झाले. त्यांना मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
न्यू जर्सी ते न्यू दिल्ली, ह्युस्टनपासून हैदराबादपर्यंत, बोस्टनपासून बेंगळुरूपर्यंत, शिकागोपासून शिमलापर्यंत आणि लॉस एंजिल्सपासून लुधियानापर्यंत भारत आणि अमेरिकेचे संबंध मानवीय आहेत, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Howdy Modi Time for a decisive battle against terrorism says PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.