आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 07:36 IST2025-12-23T07:36:07+5:302025-12-23T07:36:27+5:30
पुतीन यांनी पत्रकार परिषदेत किरिलच्या आमंत्रणाचा लगेच स्वीकार तर केला नाही; पण, त्याला नकारही दिला नाही. त्याऐवजी त्यांनी वेगळा आणि अफलातून पर्याय निवडला.

आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
परवाचीच गोष्ट. रशियातील मॉस्को येथे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची पत्रकार परिषद सुरू होती. पुतीन देशाच्या सद्य:स्थितीबाबत पत्रकारांना अवगत करीत होते. गंभीर विषयांवर आणि अतिशय गंभीरपणे ही पत्रकार परिषद सुरू होती. तेवढ्यात... एक पत्रकार आपल्या जागेवरून उठला. किरिल बाजानोव त्याचं नाव. २३ वर्षांचा तरुण पत्रकार. त्यानं भर पत्रकार परिषदेतच आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज केलं... किरिलच्या हातात एक प्लेकार्ड होतं, ज्यावर लिहिलं होतं- ‘आय वाँट टू गेट मॅरिड’!
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं आहे, किरिल बाजानोव पुतीन यांना प्रश्न विचारण्याआधी प्रेक्षकांना म्हणाला- माझी गर्लफ्रेंड हे पाहतेय. ओल्गा, तू माझ्याशी लग्न करशील का? प्लीज, माझ्याशी लग्न कर.. मी तुला प्रपोज करतोय..
थोड्या वेळानं लाइव्ह ब्रॉडकास्टच्या होस्टनंही अपडेट देत म्हटलं, ‘आम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळतेय. किरिल बाजानोवच्या गर्लफ्रेंड ओल्गानं त्याचं प्रपोजल स्वीकारलं आहे. आता ती किरिलशी लग्न करणार आहे..!’ होस्टच्या घोषणेनंतर प्रेक्षकांसोबत पुतीन यांनीही टाळ्या वाजवल्या. तेव्हा किरिलनं पुतीन यांनाही तिथल्या तिथे लग्नाचं आमंत्रण देत म्हटलं, ‘राष्ट्राध्यक्ष महोदय, तुम्ही जर आमच्या लग्नात आलात, तर आम्हाला खूप आनंद होईल.’
पुतीन यांनी पत्रकार परिषदेत किरिलच्या आमंत्रणाचा लगेच स्वीकार तर केला नाही; पण, त्याला नकारही दिला नाही. त्याऐवजी त्यांनी वेगळा आणि अफलातून पर्याय निवडला. किरिलच्या लग्नाच्या आमंत्रणाला थेट उत्तर न देता त्यांनी त्याला आर्थिक मदतीची ऑफर दिली. ते म्हणाले, ‘किरिलच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बहुधा साधारण आहे. त्याला आता लग्न करायचंय. आपलं स्वत:चं कुटुंब करायचंय. त्याचा आर्थिक खर्च आणखी वाढेल. त्याच्या लग्नासाठी आता आपण निधी गोळा करू आणि त्याला मदत करू!’
पत्रकार परिषदेतही सगळ्या पत्रकारांनी या घटनेचं आणि पुतीन यांच्या वक्तव्याचं स्वागत केलं. सध्या ही घटना सोशल मीडियावर खूपच व्हायरल होते आहे. नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. त्यानिमित्तानं पुतीन यांच्या उदारतेचे आणि दानशूरतेचे किस्सेही रंगवून सांगितले जात आहेत.
यापूर्वी एका वृद्ध महिलेला त्यांनी अशीच तातडीनं मदत केली होती. पुतीन हजर असलेल्या एका कार्यक्रमात त्या महिलेनं थेट सांगितलं होतं की मी एकटी आहे आणि एका अतिशय मोडक्या-तोडक्या जीर्ण घरात राहते आहे. घराची दुरुस्ती करण्याइतके पैसे माझ्याजवळ नाहीत आणि हे घर तर कधीतरी माझ्याच अंगावर कोसळून त्यात माझा अंत होण्याची शक्यता आहे!
हे ऐकल्यावर पुतीन यांनी तत्काळ गव्हर्नरला आदेश दिला. त्यानंतर काही आठवड्यांतच तिला नवीन घर मिळालं. रशियन टीव्हीवरही हे वृत्त तातडीनं दाखवलं गेलं. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या रशियन सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत, मुलांच्या शिक्षणासाठी साहाय्य, घरकूल योजना, आजारी मुलांच्या उपचारासाठी मदत.. यासाठी धोरण वगैरे काहीही न पाहता त्यांनी त्या क्षणी मदत दिली यासंदर्भाचे किस्से त्यांचे समर्थक आवर्जून सांगत असतात. पण, बऱ्याच नागरिकांचं म्हणणं आहे, पुतीन यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत!