अमेरिकेत अमूलचे दूध कितीला मिळते? तेथील लोक १ गॅलन घेतात, लीटर नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:41 IST2026-04-02T13:40:05+5:302026-04-02T13:41:10+5:30
Amul Milk in USA: अमूलने अमेरिकन बाजारपेठेत एन्ट्री केली असून तिथे दुधाचे दर भारताच्या तुलनेत दुप्पट आहेत. $७ प्रति गॅलन दर असूनही अमेरिकन लोक अमूलच्या प्रेमात का पडलेत? वाचा सविस्तर.

अमेरिकेत अमूलचे दूध कितीला मिळते? तेथील लोक १ गॅलन घेतात, लीटर नाही...
भारतीय डेअरी क्षेत्रातील दिग्गज ब्रँड 'अमूल'ने आता सातासमुद्रापार अमेरिकेच्या बाजारपेठेतही आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अमेरिकेतील अमूल दुधाच्या किमती सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. भारतात ज्या दराने दूध मिळते, त्यापेक्षा जवळपास दुप्पट किमतीत अमेरिकेत अमूल दुधाची विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत अमूलचे 'गोल्ड' दूध (६% फॅट) मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. अमेरिकेतील मुख्य प्रवाहातील रिटेल स्टोअर्स, जसे की 'कॉस्टको', येथे अमूल दुधाचे गॅलन पॅक्स उपलब्ध आहेत. जिथे स्थानिक अमेरिकन दूध साधारणपणे $३ ते $३.५० प्रति गॅलन दराने मिळते, तिथे अमूलच्या दुधासाठी ग्राहकांना $६.५० ते $७ (सुमारे ५४० ते ५८० रुपये) प्रति गॅलन मोजावे लागत आहेत.
किंमत जास्त असूनही मागणी का?
अमूल दुधाची किंमत जास्त असूनही तिथला भारतीय समुदाय आणि स्थानिक अमेरिकन ग्राहकही याला पसंती देत आहेत. याची काही मुख्य कारणे:
उच्च फॅट (६% Fat): अमेरिकेत सामान्यतः ३% फॅटचे दूध मिळते. अमूलचे ६% फॅट असलेले दूध चवीला क्रीमी असल्याने 'बरिस्ता मिल्क' म्हणूनही लोकप्रिय होत आहे.
कॉफीसाठी उत्तम: दाट आणि क्रीमी असल्याने कॉफीमध्ये उत्तम फेस (Froth) तयार करण्यासाठी अमूल गोल्डला पसंती दिली जात आहे.
ब्रँड व्हॅल्यू: अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी अमूल हा केवळ ब्रँड नसून एक भावनिक नाते आहे.
स्थानिक भागीदारीतून उत्पादन
अमूलने अमेरिकेत दूध निर्यात करण्याऐवजी तिथे स्थानिक डेअरी को-ऑपरेटिव्ह 'मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन' सोबत भागीदारी केली आहे. यामुळे अमेरिकेतच अमूलच्या 'रेसिपी'नुसार ताज्या दुधाचे उत्पादन केले जात आहे.