Video: फ्लोरिडामध्ये थरार! धावत्या I-95 हायवेवर विमानाची 'क्रॅश लँडिंग'; भरधाव कारला धडक, थरारक Live Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 09:53 IST2025-12-10T09:51:21+5:302025-12-10T09:53:04+5:30
Florida plane crash landing Video: 'बीचक्राफ्ट 55' मॉडेलच्या या छोट्या विमानाचे दोन्ही इंजिन हवेत असताना अचानक बंद पडले. कोणताही धोका पत्करण्याऐवजी, 27 वर्षीय वैमानिकाने रस्त्यावर उतरण्याचा (क्रॅश लँडिंग) निर्णय घेतला.

Video: फ्लोरिडामध्ये थरार! धावत्या I-95 हायवेवर विमानाची 'क्रॅश लँडिंग'; भरधाव कारला धडक, थरारक Live Video व्हायरल
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात सोमवारी संध्याकाळी एका अत्यंत व्यस्त I-95 हायवेवर अपघाताचा एक थरारक प्रसंग पाहायला मिळाला. मेरिट आयलंडजवळ अचानक इंजिन निकामी झाल्यामुळे एका लहान विमानाला हायवेच्या मधोमध आपत्कालीन लँडिंग करावी लागली. या लँडिंग दरम्यान, विमानाची धडक एका भरधाव कारला बसली, ज्यामुळे हायवेवर एकच गोंधळ उडाला. या संपूर्ण घटनेचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
'बीचक्राफ्ट 55' मॉडेलच्या या छोट्या विमानाचे दोन्ही इंजिन हवेत असताना अचानक बंद पडले. कोणताही धोका पत्करण्याऐवजी, 27 वर्षीय वैमानिकाने रस्त्यावर उतरण्याचा (क्रॅश लँडिंग) निर्णय घेतला. मात्र, सायंकाळी 5:45 च्या सुमारास, वाहतुकीने गजबजलेल्या हायवेवर उतरत असताना, विमानाची धडक एका कारला बसली.
फ्लोरिडा हायवे पेट्रोलनुसार, विमानातील वैमानिक आणि त्यांचा 27 वर्षीय सहकारी पूर्णपणे सुरक्षित आहेत, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, कार चालवणाऱ्या 57 वर्षीय महिलेला किरकोळ दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे खबरदारी म्हणून I-95 हायवेचा मोठा भाग काही काळासाठी बंद करण्यात आला होता.
INSANE footage: plane lands RIGHT on a car in Brevard County, Florida https://t.co/u8Va7MENN3pic.twitter.com/TXM1NI41vY
— RT (@RT_com) December 9, 2025
व्हिडिओ झाला व्हायरल
हा थरारक अपघात रस्त्यावरील अनेक लोकांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला. विमानाचे हायवेवर उतरणे, कारला धडक देणे आणि त्यानंतर होणारा गोंधळ या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू असून, वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळल्याचे मत अनेक लोक व्यक्त करत आहेत.