भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:55 IST2025-11-27T16:55:20+5:302025-11-27T16:55:42+5:30
Hong Kong Fire: संकुलातील आठपैकी सात टॉवर्सला आगीने जाळून खाक केले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, याच बांबूच्या मचानमुळे आणि इमारतींभोवती लावलेल्या असुरक्षित संरक्षक जाळ्यांमुळे आग वाऱ्यासारखी एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत वेगाने पसरली.

भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
गगनचुंबी इमारती कशा धोकादायक ठरू शकतात, याचे उदाहरण बुधवारी जगाने पाहिले आहे. हाँगकाँगच्या इतिहासातील गेल्या काही दशकांतील सर्वात भीषण आग नोंदविली गेली आहे. वांग फुक कोर्ट या गगनचुंबी इमारतींच्या समुहाला मोठी आग लागली. ती एवढ्या वेगाने पसरली की सुमारे २००० सदनिका जळून खाक झाल्या आहेत. आतापर्यंत ५५ मृतदेह सापडले असून अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
या इमारतींमध्ये एकूण ४८०० लोक राहत होते. या संकुलातील आठपैकी सात टॉवर्सला आगीने जाळून खाक केले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, याच बांबूच्या मचानमुळे आणि इमारतींभोवती लावलेल्या असुरक्षित संरक्षक जाळ्यांमुळे आग वाऱ्यासारखी एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत वेगाने पसरली, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत ७६ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यामुळे मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
आगीच्या लपेटांमुळे परिसरातील तापमान इतके वाढले होते की, बचावकार्य रात्रभर सुरू ठेवूनही अग्निशमन दलाच्या जवानांना उंच मजल्यांवर अडकलेल्या रहिवाशांपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. अनेक रहिवासी, ज्यात मुख्यतः वृद्धांचा समावेश होता, ते खिडक्यांच्या आतून मदतीसाठी ओरडत होते.
इमारतीमध्ये लावलेले संरक्षक जाळे आणि फोमची सामग्री आग प्रतिबंधक मानकांवर अपयशी ठरली. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या घोर निष्काळजीपणामुळे ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली आणि त्यामुळे मोठी जीवितहानी झाली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि ३ जणांना अटक
पोलिसांनी या दुर्घटनेच्या चौकशीनंतर गंभीर पाऊल उचलले आहे. नूतनीकरण करणाऱ्या बांधकाम कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.