ज्वलनशील पदार्थामुळे पसरली हाँगकाँगची आग; दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८३ वर, २८० जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:42 IST2025-11-28T10:42:18+5:302025-11-28T10:42:45+5:30
या निवासी संकुलातील इमारतींपैकी एका इमारतीच्या लिफ्ट लॉबीच्या खिडक्यांना सील करण्यासाठी पॉलियुरेथेन फोमचा तथा स्टायरोफोमचा वापर करण्यात आला आहे.

ज्वलनशील पदार्थामुळे पसरली हाँगकाँगची आग; दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८३ वर, २८० जण बेपत्ता
हाँगकाँग - येथील एका निवासी संकुलातील बहुमजली इमारतींना लागलेल्या भीषण आगीत होरपळून मरण पावलेल्यांची संख्या आता ८३ वर पोहोचली असून, २८० जण अद्यापही बेपत्ता आहेत. हाँगकाँमध्ये बुधवारी वाँग फुक कोर्ट येथे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी मनुष्यवधाच्या आरोपावरून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
या निवासी संकुलातील इमारतींपैकी एका इमारतीच्या लिफ्ट लॉबीच्या खिडक्यांना सील करण्यासाठी पॉलियुरेथेन फोमचा तथा स्टायरोफोमचा वापर करण्यात आला आहे. या ज्वलनशील पदार्थामुळेही आग वेगाने पसरली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. स्टायरोफोमला भारतात सामान्य लोक थर्माकॉल म्हणून ओळखतात.
हाँगकाँग विशेष प्रशासकीय प्रदेशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली यांनी सांगितले की, जखमी झालेल्या ६८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, १६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी सांगितले की, वाँग फुक कोर्ट येथे इमारतींवर लावण्यात आलेली संरक्षक जाळी, वॉटरप्रुफ कॅनव्हास, प्लॅस्टिकचे पत्रे हे पुरेसे अग्निरोधक नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी आग सहजी पसरू शकली.
कमी दर्जाचे अग्निरोधक सामान वापरल्याचा संशय
इमारतीची दुरुस्ती करताना तिला संरक्षक जाळ्या व इतर गोष्टी बसवून देण्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांना या आगप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी आगप्रतिबंधक उत्तम गोष्टींचा वापर इमारतीमध्ये केलेला नसल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळेच आग पसरून जीवितहानी झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बुधवारी रात्री या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करण्याचे आदेश दिले होते. हाँगकाँगमधील ५ इमारतींना लागलेली आग गुरुवारीही धुमसत होती.
थर्माकोल ठरले घातक
पोलिसांचे म्हणणे आहे की, अटक केलेल्या तिन्ही लोकांनी 'गंभीर निष्काळजीपणा' केला, ज्यामुळे इतका भयानक अपघात घडला. आगीतून बचावलेल्या एका इमारतीची तपासणी केली असता, असे आढळले की त्या टॉवरच्या सर्व मजल्यांवरील खिडक्यांवर स्टायरोफोम लावले होते. स्टायरोफोमने आग अतिशय वेगाने पसरली. इतर टॉवर्सच्या नूतनीकरणाच्या कामातही स्टायरोफोमचा वापर केला होता.