अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:40 IST2025-06-09T06:40:37+5:302025-06-09T06:40:56+5:30

United State News: अवैध प्रवाशांविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेला लॉस एंजलिसमध्ये प्रचंड विरोध सुरू झाला असून, या निदर्शनांना अटकाव करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्निया नॅशनल गार्डच्या २ हजार जवानांना तैनात केले आहे.

Hollywood city in America is on fire; stones and fireworks thrown at police, huge opposition to campaign against illegal immigrants | अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध

अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध

पॅरामाऊंट (अमेरिका) - अवैध प्रवाशांविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेला लॉस एंजलिसमध्ये प्रचंड विरोध सुरू झाला असून, या निदर्शनांना अटकाव करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्निया नॅशनल गार्डच्या २ हजार जवानांना तैनात केले आहे. लॉस एंजलिसमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असून पॅरामाऊंट शहरातही स्थानिक प्रशासनावर याच पक्षाची पकड आहे.

शुक्रवारी स्थलांतराच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४४ लोकांना अटक करण्यात आल्यानंतर काही नागरिकांची स्थानिक पोलिसांशी चकमक झाली होती. या वेळी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला होता. हा वाढता विरोध पाहता आता थेट लष्करी जवान तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेतील विविध राज्यांत तणाव आणखी वाढेल, असा आरोप कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर व डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते गॅव्हिन न्यूसम यांनी केला आहे.

अवैध प्रवाशांवर कारवाईसाठी लॉस एंजलिसमध्ये छापे टाकले गेले. यात १००हून अधिक लोकांना अटक झाली होती. नंतर शुक्रवारी झालेल्या कारवाईने या भागात तणाव अधिक वाढला. १९९२ मध्ये अशाच मुद्द्यावर अमेरिकेत दंगली पेटल्या होत्या. याच धर्तीवर आता हे आंदोलन पेटले आहे. (वृत्तसंस्था)

काय आहे प्रकरण? 
ट्रम्प प्रशासनाने स्थलांतरिताचे नियम कडक करून अवैध प्रवाशांविरुद्ध मोहीम सुरू केल्यानंतर सुमारे १ हजार लोकांनी अमेरिकेत संबंधित विभागाला घेराव घातला. या ठिकाणचे अधिकारी व सीमा शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. इमारतीचेही नुकसान केले. यानंतर ट्रम्प प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलली आहेत. 

निदर्शकांनी आंदोलनात शहरातील अनेक भागांत आग लावली. कार पेटविण्यात आल्या, यादरम्यान अनेक घरे आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सनाही आग लावण्यात आली. निदर्शकांनी फलक हाती घेत सरकारचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी अनेकांना अटक केल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे.

परिस्थिती का चिघळली?
कोणत्याही व्यक्तीला मास्क घालण्यास बंदी करण्यात आली आहे.
निदर्शक लोक हे पैसे घेऊन दंगली भडकावत असल्याचा ट्रम्प प्रशासनाचा आरोप. तुरुंगात डांबण्याची धमकी. 
विद्यार्थी निदर्शनात उतरले, पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केल्यानंतर परिस्थिती चिघळली. 

हल्ले कराल तर तुरुंगात जाल : काश पटेल
अमेरिकी तपास संस्था एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी लॉस एंजलिसमध्ये सुरू असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला आहे. कोणीही पोलिसांवर हल्ला केला तर त्यांना तुरुंगात जावे लागेल, असे पटेल यांनी म्हटले आहे. 

Web Title: Hollywood city in America is on fire; stones and fireworks thrown at police, huge opposition to campaign against illegal immigrants