२००१ मध्ये पहिल्यांदा सापडला होता HMPV, २४ वर्षांनंतरही विकसित झालेली नाही प्रतिबंधात्मक लस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:08 IST2025-01-06T16:08:10+5:302025-01-06T16:08:49+5:30
HMPV Virus Update: २००१ मध्ये एचएमपी हा विषाणू पहिल्यांदा सापडला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याला प्रतिबंध करणं आव्हानात्मक ठरत आहे. या विषाणूविरोधात अद्याप कुठलीही प्रतिबंधात्मक लस किंवा अँटीव्हायरल उपचार विकसित करता आलेले नाहीत.

२००१ मध्ये पहिल्यांदा सापडला होता HMPV, २४ वर्षांनंतरही विकसित झालेली नाही प्रतिबंधात्मक लस
मागच्या काही दिवसांपासून चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या एचएमपी विषाणूचा आता भारतातही शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये या विषाणूचे दोन रुग्ण सापडले आहेत. येथे दोन छोट्या मुलींना या विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. तर गुजरातमध्येही एचएमपीव्हीचा एक रुग्ण सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणांनी खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, २००१ मध्ये पहिला रुग्ण आढळला होता. मात्र २४ वर्ष उलटून गेल्यानंतरही या विषाणूविरोधात प्रतिबंधात्मक लस तयार होऊ शकलेली नाही.
२००१ मध्ये एचएमपी हा विषाणू पहिल्यांदा सापडला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याला प्रतिबंध करणं आव्हानात्मक ठरत आहे. या विषाणूविरोधात अद्याप कुठलीही प्रतिबंधात्मक लस किंवा अँटीव्हायरल उपचार विकसित करता आलेले नाहीत. जवळपास २५ वर्षं लोटल आली तरी एचएमपीव्हीला जागतिक पातळीवर पायबंद घालणं हे एक आव्हान बनून राहिलं आहे. मात्र या विषाणूविरोधात कुठला प्रभावी उपचार उपलब्ध नसला तरी गंभीर रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजन थेरेपी, कॉर्टिकोस्टेरॉईड यांचा वापर करून इतर उपचार करता येतात.
या विषाणूच्या संसर्गाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करणं आवश्यक असतं. एचएमपीव्हीचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी असलेल्या भागात कायम मास्कचा वापर करणे आणि वारंवार हात धुण्यासारखे उपाय करण्याची शिफारस करण्यात येते.
दरम्यान, चीनमध्ये एचएमपीव्हीच्या रुग्णांची संख्या वाढल्या कारणाने भारतात खबरदारी घेतली जात आहे, एनसीडीसीकडून थंडीच्या काळात उदभवणाऱ्या श्वसनासंबंधीच्या आजारांवर लक्ष ठेवलं जात आहे. तसेच भारतीय अधिकारी हे डब्ल्यूएचओसह जागतिक आरोग्य यंत्रणांच्या सातत्याने संपर्कात आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.