ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 07:42 IST2026-04-12T07:33:59+5:302026-04-12T07:42:06+5:30
Iran-US Talk News: इराणच्या अणुकार्यक्रमावरून पश्चिम आशियात भडकलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स व इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कालिबाफ यांच्यात शनिवारी उशीरा थेट चर्चेस सुरूवात झाली.

ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
इस्लामाबाद - इराणच्या अणुकार्यक्रमावरून पश्चिम आशियात भडकलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स व इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कालिबाफ यांच्यात शनिवारी उशीरा थेट चर्चेस सुरूवात झाली. शहरातील प्रसिद्ध सेरेना या पंचतारांकित हॉटेलमध्ये या चर्चा होत असून दोन्ही देशांचे प्रतिनिधी टेबलावर समोरासमोर बसले होते. यात अन्य कोणता तिसरा देश मध्यस्थ वा अप्रत्यक्ष सहभागी नव्हता, अशी माहिती पाकिस्तान टीव्हीने दिली.
शनिवारी अमेरिका व इराणच्या शिष्टमंडळाचे पाकिस्तानमध्ये आगमन झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केल्या. १९७९मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांतीनंतर दोन्ही देशांमधील संवाद थांबला होता. आता ४७ वर्षानंतर प्रथमच अमेरिका आणि इराण समोरासमोर बसून चर्चा करत असल्याचे दृश्य साऱ्या
जगाने पाहिले.
दोन्ही शिष्टमंडळे शनिवारी दाखल
अमेरिकेच्या शिष्टमंडळात व्हॅन्स यांच्यासोबत प. आशियातील अमेरिकेचे विशेष दूत विटकॉफ आणि जॅरेड कुशनर आहेत. तर इराणच्या जम्बो शिष्टमंडळात ७१ जण असून त्यात कालिबाफ यांच्याव्यतिरिक्त परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची, राष्ट्रीय संरक्षण परिषदेचे सचिव अली अकबर अहमदियान, केंद्रीय बँकेचे गव्हर्नर अब्दुलनासर हिंमती, काही रणनीतीकार, सामरिक तज्ज्ञ आहेत.
पाकिस्तानची 'एअर मोबिलिटी डिसेप्शन' यंत्रणा
इराणच्या शिष्टमंडळाला घेऊन येणाऱ्या विमानाला संरक्षण म्हणून पाकिस्तानने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. रडारवर दिसू नये म्हणून इराणच्या 'एअरबस ए ३००' विमानाचा ट्रान्सपॉन्डर बंद ठेवण्यात आला होता.
या विमानासोबत पाकिस्तानचे 'एअरबस ए ३२१' हे विमान समांतर उड्डाण करत होते. या विमानाचा ट्रान्सपॉन्डर सुरू होता. त्यामुळे रडार यंत्रणांना केवळ पाकिस्तानचे विमानच दिसत होते.
इराणचे विमान अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्रातून पाकिस्तानात येईपर्यंत पाकिस्तानी हवाई दलाची फायटर जेट्स आणि अवॅक्स यंत्रणा सतत तैनात होती.
‘पूर्वअटी मान्य केल्याशिवाय चर्चा नाही’
या चर्चेच्या अगोदर इराणने आमच्या पूर्वअटी मान्य होत नाहीत, तोपर्यंत चर्चा सुरू होणार नाही, असा पवित्रा घेतला. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना कालिबाफ यांनी आम्ही सद्भावनेतून येथे आलोय पण आमचा अमेरिकेवर विश्वास नाही असे स्पष्ट केले. वर्षभरात दोनदा चर्चे दरम्यान अमेरिकेने आमच्यावर हल्ले केले.
लेबनॉनवरचे इस्रायलचे हल्ले पूर्ण थांबणे व इराणची गोठवलेली संपत्ती मुक्त करणे या आमच्या पूर्वअटी असतील असेही कालिबाफ यांनी सांगितले. इराणने वाटाघाटींसाठी १० कलमी प्रस्तावही तयार केला आहे.
अमेरिकेचा कठोर पवित्रा : इराण प्रामाणिकपणे चर्चा करणार असेल, तर आम्ही नक्कीच मदतीचा हात पुढे करू. पण त्यांनी जर आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना आमचे शिष्टमंडळ अजिबात मवाळ नाही, हे कळून चुकेल असा इशारा जे.डी. व्हॅन्स यांनी दिला.
'जग विक्रम' रवाना
नवी दिल्ली : युद्धविरामानंतर भारताचा ध्वज असलेल्या एलपीजी टँकर 'जग विक्रम'ने शनिवारी होर्मुझचा मार्ग सुरक्षितपणे पार केला. विरामानंतर हे पहिले भारतीय जहाज असून यात सुमारे २०,४०० टन एलपीजी व २४ खलाशी आहेत.
होर्मुझ 'मोकळी'ची प्रक्रिया सुरू : ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स, जर्मनी आणि अन्य देशांवर उपकार म्हणून 'होर्मुझची सामुद्रधुनी' मोकळी करण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत, असे वक्तव्य केले. या देशांकडे हे काम करण्याची हिंमत, इच्छाशक्ती नाही, म्हणून आम्ही करत आहोत असे ते म्हणाले. पण सामुद्रधुनी 'मोकळी' करणे म्हणजे नेमके काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.