पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:21 IST2025-07-16T11:21:21+5:302025-07-16T11:21:53+5:30
एका मुलाखतीत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राष्ट्रपती जरदारी पदाचा राजीनामा देऊ शकतात असे त्यांनी म्हटले

पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
इस्लामाबाद - पाकिस्तानात सध्या उच्चस्तरीय बैठकांचा सिलसिला सुरू आहे. ज्यामुळे इस्लामाबादच्या राजकारणात खळबळ माजली आहे. लवकरच राष्ट्रपती आसिफ अली जरदारी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात असं संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संकेत दिलेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ, राष्ट्रपती आसिफ अली जरदारी आणि सैन्य प्रमुख फिल्ड मार्शल सैय्यद आसिम मुनीर यांच्यात सातत्याने बैठका सुरू आहेत. देशाच्या राजकीय प्रणालीत मोठे बदल होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रपती जरदारी राजीनामा देतील अथवा देशातील संसदीय प्रणाली संपवून राष्ट्रपती प्रणालीची सुरुवात होऊ शकते असं बोलले जात आहे.
रिपोर्टनुसार, शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान निवासस्थानी सैन्य प्रमुख आसिम मुनीर यांच्यासोबत बैठक घेतली. त्याच्या काही तास आधीच त्यांनी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांच्याही चर्चा केली. आसिफ मुनीर लवकरच आसिफ अली जरदारी यांची जागा घेऊ शकतात असं पाकिस्तानी माध्यमात बोलले जात आहे. पाकिस्तानच्या संविधानात २७ वी घटना दुरुस्ती करण्याची चर्चा आहे. राष्ट्रपती जरदारी पदाचा त्याग करतील आणि कदाचित राष्ट्रपतीपदासाठी अन्य एकासाठी मार्ग मोकळा केला जाऊ शकतो.
एका मुलाखतीत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राष्ट्रपती जरदारी पदाचा राजीनामा देऊ शकतात असे त्यांनी म्हटले. राष्ट्रपती जरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या भेटीनंतर या चर्चांना उधाण आले. परंतु मीडियातील अनेक रिपोर्टला ख्वाजा आसिफ यांनी नाकारले. राष्ट्रपती जरदारी यांनीही माध्यमातील रिपोर्टवर प्रश्नचिन्ह उभे करत कुठल्याही बदलाच्या शक्यतेला नकार दिला आहे. काही पाकिस्तानी पत्रकारांचे म्हणणं आहे की, देशात राष्ट्रपती राजवट सुरू होऊ शकते. आसिम मुनीर हे नवे राष्ट्रपती असू शकतात. मात्र याबाबत वृत्त देणारे अनेक युट्यूब चॅनेल बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान, सैन्य प्रमुख राजकारणात फार रस घेत नाहीत असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटले. त्यांनी माध्यमांना चुकीच्या बातम्या पसरवू नका असा सल्लाही दिला. मात्र देशात होत असलेल्या या बैठकांवरून कुणीही स्पष्टपणे बोलण्यास नकार देत आहे. सैन्य प्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांना ज्यारितीने जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे त्यामुळे राजकीय वातावरण बदलले आहे. सध्या कुठल्याही घटना दुरुस्तीचा विचार नाही. परंतु संविधानात बदल करणे ही प्रक्रिया आहे. याआधीही २६ वेळा बदल झाले आहेत असं संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले.
आसिम मुनीर यांना राष्ट्रपती का बनायचंय?
आसिम मुनीर पाकिस्तानात संसदीय व्यवस्था संपवून अमेरिकेसारखी राष्ट्रपती शासन व्यवस्था आणू पाहत आहेत. सध्या सर्व अधिकार पंतप्रधानांकडे आहेत. आसिम मुनीर घटना दुरुस्ती करून अधिकार राष्ट्रपतींकडे घेऊ इच्छितात. याआधी परवेज मुशर्रफ यांनी हे केले होते. पाकिस्तानात पुन्हा एका सत्तांतर घडेल असं बोलले जात आहे.