जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 08:24 IST2025-12-18T08:23:50+5:302025-12-18T08:24:26+5:30
जास्त गहू उत्पादनामुळे तुर्कीमध्ये सध्या असे मोठमोठे खड्डे निर्माण होताहेत! तुर्कीचं अन्नभांडार म्हणून ओळखलं जाणारं कोन्या मैदान सध्या या गंभीर समस्येला सामोरं जात आहे.

जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
धान्याचं जास्त उत्पादन तुम्ही काढलंत तर काय होईल? - हे धान्य तुम्ही बाजारात विकलं तर तुम्हाला त्याचे जास्त पैसे मिळतील, घरासाठीच ठेवलं, तर जास्त काळ पुरेल, गरजेपेक्षा जास्त उत्पादन काढलं, तर तुमच्या शेतीची उपज कमी होईल, पण जास्त उत्पादन काढल्यामुळे तुमच्या शेतात विहिरींपेक्षाही मोठे खड्डे तयार झाले आणि तुम्हाला स्थलांतर करावं लागलं तर?..
मोठे म्हणजे किती? तर जवळपास शंभर फूट रुंद आणि तीस फूट खोला तुर्कीमध्ये सध्या हेच होत आहे. त्यामुळे त्या देशातले शेतकरी आणि सरकारही प्रचंड हादरलं आहे. सर्वसाधारणपणे विहिरीची खोली सुमारे वीस ते तीस मीटर असते, तर रुंदी अडीच ते चार मीटर असते! आता हे प्रमाण पाहिलं तर हे खड्डे किती प्रचंड मोठे आहेत याची कल्पना येईल!
जास्त गहू उत्पादनामुळे तुर्कीमध्ये सध्या असे मोठमोठे खड्डे निर्माण होताहेत! तुर्कीचं अन्नभांडार म्हणून ओळखलं जाणारं कोन्या मैदान सध्या या गंभीर समस्येला सामोरं जात आहे. इथे तुर्कीमधील सर्वाधिक गहू पिकवला जातो. कोन्या मैदानाचं एकूण कृषी क्षेत्र सुमारे २.६ दशलक्ष हेक्टर आहे, जे तुर्कीच्या एकूण कृषी क्षेत्राच्या ११.२ टक्के आहे. क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन आणि ग्राउंड वॉटरचा अतिवापर यामुळे हा परिसर गेल्या काही काळापासून दुष्काळाचा सामना करत आहे. यामुळे लोकांची शेतजमीन उद्ध्वस्त होत आहे.
केवळ कोन्यामध्येच आतापर्यंत सुमारे सातशे खड्डे तयार झाले आहेत. कोन्या टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या सिंकहोल रिसर्च सेंटरनुसार, २०१७मध्ये २९९ सिंकहोल होते, जे २०२१ पर्यंत वाढून २,५५० झाले! २०२५ मध्ये आणखी २० नवे मोठे सिंकहोल तयार झाले आहेत. या अवाढव्य खड्यांमुळे मोठे अपघात होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळेही लोक हवालदिल झाले आहेत.
अर्थातच हे संकट अचानक आलेलं नाही, तर गेल्या २० वर्षांपासून शेतकरी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ते हळूहळू वाढत गेलं आहे. दुष्काळ आणि भूजल उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, मानवानं स्वतःहून ओढवून घेतलेली ही आपत्ती आहे आणि निष्काळजीपणानं तिला आणखी चालना मिळाली आहे.
असं का होतंय, त्याचीही काही शास्त्रीय कारणं आहेत. कोन्या मैदानाची भूवैज्ञानिक रचना 'कार्स्ट' प्रकारची आहे, म्हणजेच हे मैदान कार्बोनेट आणि जिप्समसारख्या विरघळणाऱ्या खडकांपासून बनलेलं आहे. हे खडक हजारो वर्षांमध्ये पाण्यात विरघळून खड्डे तयार करतात. पूर्वी इथे सिंकहोल फारच कमी तयार होत होते, पण जमिनीखालचं पाणी कमी झाल्यानं मैदानाला आधार मिळेनासा झाला आणि ते अचानक कोसळायला लागलं.
तुर्कीमध्ये गेल्या १५ वर्षात पाण्याची पातळी सर्वात खालच्या स्तरावर पोहोचली आहे. हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, त्यामुळे जलसाठे पुनर्जिवितच होत नाहीत. कोन्यामध्ये बीट, मका आणि इतर पाणीखाऊ पिकांच्या सिंचनासाठी हजारो वैध आणि अवैध विहिरी चालू आहेत. १९७० च्या दशकापासून काही भागांमध्ये ग्राउंड वॉटर लेव्हल ६० मीटरपर्यंत घसरली आहे. अवैध विहिरी आणि अनियंत्रित पम्पिंगमुळे जमीन कमकुवत झाली आहे. यामुळे तुर्कीमध्ये स्थलांतराची भीतीही प्रचंड प्रमाणात वाढली आहे.